सोलापूर: साखरेला उठाव नसल्याने केंद्र शासनाने सॉफ्टलोन घेण्यास साखर कारखान्याला परवानगी दिल्याने राज्यातील ४२ साखर कारखान्यांना महाराष्टÑ राज्य सहकारी (शिखर) बँकेने ६८९ कोटी २ लाख ७९ हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांचा समावेश आहे.
यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले शिवाय मागील वर्षीच्या गाळपाची कारखान्यांकडे साखर शिल्लक आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांना शेतकºयांच्या उसाचे पैसे देणे कठीण झाले आहे. साखर विक्री होत नसल्याने कारखान्यांकडून सॉफ्टलोन घेण्यास परवानगी मागितली होती. केंद्र शासनाने सॉफ्टलोन घेण्यास परवानगी दिली आहे. कारखान्यांनी आपापल्या सोईने विविध बँकांकडे कर्जाची मागणी केली असून, राज्य बँकेने राज्यातील ४२ कारखान्यांना ६८९ कोटी २ लाख ७९ हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे़ या कर्जावरील एक वर्षाचे व्याज हे केंद्र शासन भरणार आहे.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याला ४१ कोटी ९३ लाख, लोकमंगल शुगर इथेनॉल भंडारकवठेला १६ कोटी ५८ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याला १३ कोटी ५३ लाख, संत दामाजी सहकारी कारखान्याला ११ कोटी ७ लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे.
विघ्नहर जुन्नर, जवाहर शेतकरी, छत्रपती शाहू कोल्हापूर, शरद नरंदे, कुंभारी- कासारी, दत्त इंडिया, शरयु अॅग्रो, आर. पवार शिरुर, जयवंत शुगर, विश्वासराव शुगर,संजीवनी अहमदनगर, भाऊराव चव्हाण नांदेड, एस.एम. मंडलिक, लोकनेते सुुंदरराव सोळंखे, किसनवीर सातारा,सद्गुरु सांगली, सिद्धी शुगर, पूर्णा हिंगोली, समर्थ, प्रसाद शुगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पराग अॅग्रो,संत तुकाराम, अशोक अहमदनगर, किसनवीर खंडाळा, उटेक शुगर, भाऊराव चव्हाण युनिट-२, धाराशिव युनिट-१, पूर्णा हिंगोली युनिट-२, तुकाई हिंगोली, समर्थ युनिट-२, काडवा नाशिक, छत्रपती माजलगाव, भाऊराव चव्हाण युनिट-३, राजगड सहकारी, श्री.क्रांती शुगर, ग्रीन पॉवर शुगर, धाराशिव युनिट-२ या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केले आहे.
महिनाअखेर मुदत- यापैकी १८ साखर कारखान्यांनी १६९ कोटी ६८ लाख ७५ हजार रुपये कर्ज उचलले असून, अन्य कारखान्यांना राज्य शासनाचे हमीपत्र, कारखान्याकडून अन्य कागदपत्रे सादर झाल्यानंतर कर्ज वितरीत केले जाणार आहे. ३१ मेपर्यंत कर्ज उचलण्यास साखर आयुक्तांनी मुदत दिली आहे.
जिल्हा बँक देणार दोन कारखान्यांना कर्ज - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बबनराव शिंदे शुगर तुर्कपिंपरी या कारखान्याला २४ कोटी ५४ लाख ९५हजार रुपये कर्ज दिले असून, आणखीन एका कारखान्याला कर्ज मंजूर केले जाणार आहे. सोलापूर जिल्हा बँकेने मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या बँकांनाही सहकर्जदार म्हणून घेतल्याचे सांगितले.