ऑनलाइन लोकमत
नागपूर : मनसेचे स्थानिक नेते प्रवीण श्रीनिवास बरडे यांची ६९ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी बरडे यांच्या दोन भागीदारांना अटक केली. प्रदीप गंगाधरराव कोयाडवार (वय ५०) आणि नरेंद्र गंगाधरराव कोयाडवार (वय ५२, दोघेही रा. रेशिमबाग) अशी आरोपींची नावे आहे.
कोयाडवार बंधू आणि बरडे यांची भागिदारीत श्री श्रीनिवास एन्टरप्रायजेस नावाने फर्म होती. डाबर, गोदरेज आणि अशाच काही कंपन्यांची विविध उत्पादने ते विकत होते. बरडे यांच्या तक्रारीनुसार, २०१२ ते २०१६ या कालावधीत झालेल्या व्यवहाराच्या खोट्या नोंदी करून आणि खोटी माहिती देऊन कोयाडवार बंधूंनी त्यांचा विश्वासघात केला. फर्ममधील व्यवहाराची ६८ लाख, ९७ हजार, ६९ रुपयांची अफरातफर केल्याचे डिसेंबर २०१५ मध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे जून २०१६ मध्ये बरडे यांनी कोयाडवार बंधूंविरुद्ध कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर कोयाडवार बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.