राम शिनगारे/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 14 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या अनुदानित मंजूर रिक्त पदांचा आकडा शंभरीत पोहोचला आहे. मागील वर्षी १ जुलै २०१६ रोजी प्रकाशित झालेली ८९ पदांची जाहिरात रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या पदांची पुन्हा जाहिरात काढण्याचे स्पष्ट आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या शिष्टमंडळाला नुकतेच दिले. रिक्त पदांची बिंदू नामावली पुन्हा तपासून प्राध्यापक आणि कर्मचा-यांची पुन्हा जाहिरात देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यापीठात मागील वर्षी १ जुलैै रोजी १८ प्रोफेसर, २९ सहयोगी प्राध्यापक आणि ४२ सहायक प्राध्यापक अशा एकूण ८९ पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर या पदांसाठी देशभरातून २५०० पेक्षा अधिक पात्र उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. मागील ११ महिन्यात या अर्जांवर साचलेली धुळ झटकलेली नाही. या अर्जांची छाननी तर दुरची गोष्ट आहे. या भरतीमध्ये संधी मिळण्यासाठी अनेकांनी विविध मार्गानी प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता सर्वांचाच अपेक्षाभंग होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. बामुक्टा संघटना आणि पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांविषयी भेट घेतली आहे. यावेळी आमदार चव्हाण यांनी प्राध्यापकांच्या पदभरतीविषयी देण्यात आलेल्या जाहिरातीला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्यामुळे सदरील जाहिरात रद्द करत नव्याने पुन्हा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. नविन प्राधिकरणे ३१ आॅगस्टपर्यंत अस्तित्वात येणार आहेत. तोपर्यंत जाहिरातीद्वारे अर्ज मागवून छाननीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. नविन प्राधिकरणे आल्यानंतर मुलाखत पॅनल तयार करत पदभरती करण्यास कुलगुरूंनी मान्यता दर्शविली असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. मागील वर्षीच्या १ जुलै रोजी देण्यात आलेली जाहिरात रद्द झाल्यास १२ मार्च २०१० ते १ जूलैै २०१६ या सात वर्षांच्या कालावधीत तब्बल सहा वेळा जाहिरात देऊन भरती प्रक्रिया विविध कारणांमुळे झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.ज्येष्ठ प्राध्यापक सेवानिवृत्त होताहेतविद्यापीठ प्रशासनाने मागील वर्षी १ जूलैै रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार प्राध्यापकांच्या ८९ जागा रिक्त होत्या. मात्र यानंतरच्या १० महिन्यात बहुतांश विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत. यात डॉ. वि.ल. धारूरकर, डॉ. सुधीर गव्हाणे, प्रा. जयदेव डोळे, डॉ. काशिनाथ रणवीर, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर, डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. माधवराव सोनटक्के, डॉ. एस.पी.झांबरे, डॉ. बजाज आदी प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. याशिवाय डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. एस. टी. सांगळे हे महाविद्यालयात गेले आहेत.डॉ. मेबल फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. तसेच येत्या एक -दोन महिन्यात डॉ. सतीश बडवे, डॉ. विनायक भिसे यांच्यासह अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे हा आकडा शंभरीच्याही पुढे जात आहे. अशा आल्या जाहिरातीविद्यापीठात मोठ्या प्रमाणात प्राध्यापक भरतीसाठी पहिली जाहिरात १२ मार्च २०१० रोजी काढण्यात आली. यानंतर कोर्टाच्या आदेशामुळे हीच जाहिरात २५ मार्च २०१० रोजी शुध्दीपत्रकाने काढण्यात आली. मात्र पदे काही भरण्यात आली नाहीत. तीसरी जाहिरात ११ आॅगस्ट २०१२ रोजी निघाली. चौथी व पाचवी जाहिरात २८ नोव्हेंबर २०१३ (विज्ञान व सामाजिकशास्त्रे यांची वेगवेगळी) आणि सहावी जाहिरात १ जूलै २०१६ रोजी काढण्यात आली आहे. सर्व जाहिरातीमध्ये एकदाही पदभरती करण्यात आली नाही. यामुळे प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा आकडा शंभरी पार गेला आहे. आता सातव्यांदा याच पदासाठी पुढील दोन महिन्यात जाहिरात काढण्याच्या हालचाली सुरु होणार आहेत. या सर्व दिरंगाईमुळे अनेक विभागामध्ये एक, दोन प्राध्यापकच उरले आहेत. याचा परिणाम विद्यापीठाच्या संशोधन, गुणवत्तेवर होत आहे.
प्राध्यापकांच्या रिक्त पदांची सात वर्षांत सहाव्यांदा निघालेली जाहिरात रद्द होणार
By admin | Published: May 14, 2017 5:05 PM