मुंबई : राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करुनही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील 1307 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोज 7 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 1398 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदाच्या वर्षाचा विचार केल्यास हा आकडा 91 नं खाली आला आहे. मात्र राज्याच्या विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये 477 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यातील 454 शेतकऱ्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात 598 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्य सरकारनं गेल्या वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास 38 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अद्यापही लाखो शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जुन्या कर्जाची परतफेड न केल्यानं बँका शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
राज्यात दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 6 महिन्यांत 1307 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 10:59 AM