मुंबई - नवीन वर्षाला सुरुवात होत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे. या वर्षी लोकसभेसह राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात विविध राजकीय उलथापालथी होतील असं बोलले जात आहे. त्यातच नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या नेत्यांनी परस्पर २ दावे केले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. सतेज पाटील म्हणाले की, अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची नावे अंतिम नाही. शिंदे गटाच्या ७ खासदारांनी भाजपाला लेखी कळवलं आहे की आम्हाला भाजपाच्या कमळ चिन्हावर लढायचे आहे अशी माझी माहिती आहे. १० तारखेला आमदारांचा निर्णय काय होतो यावर पुढचे राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होईल असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच राज्यात लोक मतदानाची वाट पाहत आहेत. लोकांना संधी हवी. महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळेल असा अंदाज आहे. केंद्र सरकारनं जी विकसित भारत यात्रा काढली त्याला राजकीय पक्षांनी विरोध करण्याऐवजी जनतेने विरोध केला. हे सगळे खोटे आहे असं लोक म्हणतायेत. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्हाला कोणत्या जागा हव्यात यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे यादी दिली आहे. येणाऱ्या ८ ते १० दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटपाचे गणित स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. भाजपाच्या गैरकारभाराविरोधात इंडिया आघाडीकडून लढणे या प्राधान्य असणार आहे. अनेक इच्छुक उमेदवार आहेत. काही सरप्राईज देखील मिळू शकतो. वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. जिंकून येईल तो उमेदवार दिला जाईल. आधी जागावाटप होईल त्यानंतर कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल ते कळेल असंही पाटलांनी सांगितले.
निधीवाटपाविरोधात कोर्टात जाणार
संकप्ल यात्रेतून काय विकल्प मिळाला हे लोकांना कळालं नाही. कसे पक्ष फोडले, कसं सूरतमार्गे गुवाहाटीला गेले हे सांगणार आहेत का माहिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यात ४ विरोधी आमदारांच्या मतदारसंघात निधी दिला जात नाही. सत्ताधारी म्हणून १० पैसे जास्त घेतले तर हरकत नाही. परंतु विरोधी पक्षाच्या आमदाराला काहीच निधी दिला जात नाही. सर्वांना समान वागवले पाहिजे. निधीवाटपात दुजाभाव केला जात आहे. मी यावर पत्र देणार आहे जर काहीच निर्णय झाला नाही तर मी निधीवाटपाबाबत कोर्टात जाणार असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.
सतेज पाटलांच्या दाव्यावर उदय सामंताचा प्रतिदावा
काँग्रेसचे ८-९ नेते हे भाजपाच्या संपर्कात आहे. त्यांची अधिकृत यादी माझ्याकडे आहे. मी जाहीर करेन. सतेज पाटलांकडे जशी यादी आहे तशी माझ्याकडेही ९ जणांची यादी आहे. कोण कुठे भेटले, कोण कुठे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले हे सगळे मला माहिती आहे असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी सतेज पाटलांच्या दाव्यावर प्रतिदावा केला आहे.