गडचिरोली : चीनमध्ये सध्या थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा फटका महाराष्ट्रातील 7 विद्यार्थ्यांना बसला आहे. हे विद्यार्थी तिथे सुरक्षित असले तरी त्यांना कुठेही बाहेर जाऊ देण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे पालक चिंतेत असून भारतीय दुतावासाच्या मदतीने त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमधल्या वुहान शहरातील हुबे विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेले हे विद्यार्थी पुणे, नांदेड, गडचिरोली आणि भद्रावती येथील रहिवासी आहेत. त्यात गडचिरोलीचे रहिवासी आणि सध्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे कार्यरत असलेले तहसीलदार दयाराम भोयर यांची कन्या सोनाली हिचा समावेश आहे. सोनालीसोबत भद्रावती (चंद्रपूर) येथील एक मुलगीही तिथे असून त्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत आहेत.यासंदर्भात 'लोकमत'शी बोलताना तहसीलदार भोयर यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांना सध्या बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. सोनालीसोबत आम्ही बोलतो पण तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आमचा जीव काळजीत पडला आहे. मुलीला भारतात परत आणण्यासाठी खासदार अशोक नेते यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडेही मेल पाठवून विनंती केली आहे. चीनमधील भारतीय दूतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, पण चीन सरकारने अद्याप बाहेर पडण्यास परवानगी दिलेली नाही, असे भोयर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अडकले महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:12 PM