मुंबई : एमएमआरडीएमार्फत मुंबई महानगर क्षेत्रात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या परवडणाऱ्या घरांपैकी सुमारे ७ हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच म्हाडाच्याही दुसऱ्या टप्प्यातील घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात गिरणी कामगारांसाठी सुमारे १0 हजार घरे उपलब्ध होणार असल्याने कामगारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार म्हाडामार्फत बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी काढून आतापर्यंत ५ हजार ६४४ गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात म्हाडामार्फत ६ गिरण्यांच्या जमिनीवर ६ हजार ७९४ सदनिका बांधण्यात येणार आहेत. म्हाडाकडून या वर्षअखेरीस ५ हजार २00 घरे उपलब्ध होणार आहेत.एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यात सुमारे २५ हजार घरे बांधण्याचे ठरविले आहे. त्यापैकी ठाणे वर्तक नगर आणि मीरा-भार्इंदर आणि इतर काही भागांतील ७ हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरांचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, बंद गिरण्यांच्या जागेवर सर्व गिरणी कामगारांना घरे देणे शक्य नसल्याने गिरणी कामगार संघटनांनी एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणारी घरे गिरणी कामगारांना देण्याची मागणी केली होती.
एमएमआरडीएची ७ हजार घरे तयार
By admin | Published: July 18, 2015 1:08 AM