मुंबई : आगामी नगरपरिषद आणि पंचायत निवडणुकींसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ७० टक्के उमेदवारांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज आणि शपथपत्र दाखल केली आहेत. पहिल्या टप्प्यात १६५ नगरपरिषदा आणि ३ हजार ७५० पंचायतींच्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडे एकूण २४ हजार १९१ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी २० हजार ७१६ अर्ज वैध ठरले आहेत, तर थेट नगराध्यक्षपदाच्या १४७ जागांसाठी २ हजार ३७४ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली असून, त्यापैकी १ हजार ५३३ अर्जे वैध ठरली आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेले ७० टक्के अर्ज आणि शपथपत्र आॅनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण १९२ नगरपरिषदा व २० नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी चार टप्प्यांत निवडणुकीची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यातील २५ जिल्ह्यांमधील १४७ नगरपरिषदा व १८ नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी २९ आॅक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती, तर ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले, तरी आॅनलाइन निवडणूक प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी वीज आणि इंटरनेटबाबतच्या तक्रारी आल्यानंतर, अखेरचे दोन दिवस पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
७० टक्के अर्ज आॅनलाइन पद्धतीने
By admin | Published: November 11, 2016 5:36 AM