उस्मानाबाद : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत. याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे. तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उस्मानाबादेत दिली.उस्मानाबाद जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी उस्मानाबादेत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला. आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली़ पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आहेत. यासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही भागात अन्न-धान्याची टंचाई भासल्यास तेथे पुरवठ्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘अवनी’ प्रकरणात मुनगंटीवारांची पाठराखणअवनी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखणच केली. ते म्हणाले, परिस्थितीनुसार काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मुनगंटीवार यांचा राजीनामा घ्यायला त्यांनी स्वत: तर बंदुक हातात घेवून अवनीला ठार केले नाही ना? मात्र, ठार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्यात काही चूक झालेली असल्यास चौकशी करुन योग्य ती कारवाई करु, असे फडणवीस म्हणाले.