ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - मुंबईतील ७/११ च्या बॉम्बस्फोटातील १२ पैकी आठ दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी विशेष सत्र न्यायालयाकडे केली आहे. तर उर्वरित चौघा दोषींना किमान ६० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा द्यावी असेही सरकारी वकीलांनी न्यायालयासमोर म्हटले आहे. दोषींच्या शिक्षेवरची सुनावणी आता ३० सप्टेंबररोजी होणार आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेमधील लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक असे सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये १८८ जणांचा मृत्यू झाला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी विशेष सत्र न्यायालयाने निकाल दिला असून १३ पैकी १२ जणांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान अशी या दोषींची नावे आहेत. दोषींच्या शिक्षेवर बचाव पक्षांचा मंगळवारी युक्तीवाद संपला. तर बुधवारी सरकारी वकीलांनी शिक्षेसंदर्भात युक्तीवाद केला. १२ पैकी ८ दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली आहे. शिक्षेसंदर्भातील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.