धनंजय वाखारे /आॅनलाइन लोकमत नाशिक : सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना ‘इतर मतदार’ म्हणून स्वत:ची ओळख जपण्याचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर आता येत्या २१ फेबु्रवारीला होणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ७२ तृतीयपंथी मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या तीन वर्षांत मतदार यादीत २२ तृतीयपंथी मतदारांची भर पडली आहे. सन २०१४ पूर्वी कोणत्याही निवडणुकांमध्ये तृतीयपंथी मतदारांचा समावेश पुरुष गटातच केला जात होता. परंतु, तृतीयपंथीयांना स्त्री-पुरुष गटात न टाकता त्यांची इतर मतदार म्हणून स्वतंत्र नोंद करण्यात यावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा पुकारला होता. अखेर, सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तृतीयपंथीयांचा ‘इतर मतदार’ या स्वतंत्र कॅटेगिरीत समावेश करण्यात येऊन त्यांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला. महाराष्ट्रात सुमारे ४१ हजारांहून अधिक तृतीयपंथी असल्याचे सांगितले जाते. त्यातील ९८४ तृतीयपंथीयांनीच मतदार यादीत नाव नोंदवले होते. सन २०१४ मध्ये झालेल्या नाशिक लोकसभा निवडणुकीत ५० तृतीयपंथी मतदार होते. परंतु इगतपुरीतील केवळ दोनच तृतीयपंथीयांनी मतदान केल्याची नोंद झाली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ५० मतदार होते. आता महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी पहिल्यांदाच मतदान करणार असून, शहरात ७२ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत तृतीयपंथीय मतदारांच्या संख्येत २२ ने भर पडली आहे. विशेष म्हणजे राज्यात मुंबई महापालिका निवडणुकीत एक तृतीयपंथी उमेदवारही नशीब आजमावत आहे. इन्फो गुरूच्या शिफारशीने नोंदणी तृतीयपंथीयांकडून वयाचा अथवा निवासाचा दाखला उपलब्ध होणे अवघड असते. त्यामुळे मतदार यादीत कशाप्रकारे नोंद करायची, याबाबत संभ्रम होता. परंतु, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, त्यांच्या गुरूने शिफारस केल्यानंतरच मतदार यादीत त्यांची नोंद करण्यात येऊ लागली आहे. मतदार नोंदणीच्या शपथपत्रात गुरू आणि चेला असे दोन रकाने ठेवलेले असतात. त्यात पालकाच्या नावाऐवजी गुरूचे नाव लिहायचे आणि गुरूने शिफारस केल्यानंतर त्यांची नोंद केली जाते. त्यामुळे मतदानाच्या हक्काबाबत आता तृतीयपंथीही जागरूक झाले आहेत.
७२ तृतीयपंथी बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 9:00 PM