बार्शीमधील ७२ वर्षीय लतिफ बागवान 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 06:54 PM2022-10-17T18:54:26+5:302022-10-17T18:55:32+5:30

बागवान व्यवसायाने टेम्पो ड्रायव्हर आहेत. साधारण 1975 पासून ते काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत.

72-year-old Latif Bagwan from Barshi will participate in 'Bharat Jodo' Yatra! | बार्शीमधील ७२ वर्षीय लतिफ बागवान 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार!

बार्शीमधील ७२ वर्षीय लतिफ बागवान 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार!

Next

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पांगरी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील ७२ वर्षीय लतिफ शक्करजी बागवान हे स्वयंस्फूर्तीने निघाले आहेत. ते उद्यापासून कर्नुल (आंध्र प्रदेश) येथून यात्रेत सहभागी होणार असून आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने माजी राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे , प्रदेश सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बागवान व्यवसायाने टेम्पो ड्रायव्हर आहेत. साधारण 1975 पासून ते काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. इंदिरा गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव असून इंदिरा गांधी यांच्याशी ते पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना लिहिलेली पत्रे त्यांनी आजही जतन करून ठेवली आहे. बागवान हे आंध्र प्रदेशातील कर्नुल येथून यात्रेत सहभागी होत असून तेथून पुढे आलुरु, मंत्रालयम, अडोनी, रायचुर आदी ठिकाणी होणाऱ्या यात्रेत ते पायी चालत सहभागी होणार आहेत. दिवाळीपर्यंत साधारण ८ दिवस ते या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या यात्रेमध्येही पायी चालत सहभागी होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही देशाची लोकशाही वाचविण्यासाठी अत्यंत आवश्यक असून त्यात सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन बागवान यांनी यावेळी केले.

सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, ७२ व्या वयामध्येही भारत जोडो यात्रेमध्ये स्वयंस्फूर्तीने चालत सहभागी होण्याचा बागवान यांचा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे. भारत जोडो यात्रेसमवेत सर्वस्तरातील लोक जुळत आहेत. यातून भावी काळामध्ये परिवर्तन अटळ आहे. लहान, थोर, ज्येष्ठ अशा सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा पाहून आमचाही उत्साह वाढला आहे. महाराष्ट्रामध्येही भारत जोडो यात्रा सर्वांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. बागवान यांना यात्रेसाठी शुभेच्छा देतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 72-year-old Latif Bagwan from Barshi will participate in 'Bharat Jodo' Yatra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.