"पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 09:20 PM2022-11-19T21:20:45+5:302022-11-19T21:22:16+5:30

शेतकरी आंदोलनातील शहिदांना भारत जोडो यात्रेत श्रद्धांलजी अर्पण

733 casualties could have been avoided if PM had interacted with farmers Says Rahul Gandhi | "पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते"

"पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते"

Next

बुलढाणा - भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी त्रस्त आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे रद्द करावे लागले, या घटनेला आज एक वर्ष झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

भारत जोडो यात्रेच्या आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजता गजानन दादा पाटील मार्केट यार्ड, शेगाव येथून झाली व भस्तान गावात पदयात्रेची सांगता झाली. यावेळी चौक सभेत शहिद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचा आवाज हा देशाचा आवाज आहे. तीन काळे कृषी कायदे अन्यायकारक होते म्हणूनच देशातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध करत तीव्र आंदोलन केले. दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला पण मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. काही मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी मोदींनी काळे कृषी कायदे आणले होते. सरकारकडे पोलीस, शस्त्रे, प्रशासन सर्व काही होते पण शेतकऱ्यांकडे फक्त त्यांचा आवाज होता. सरकारच्या हटवादीपणामुळे ७३३ शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला, हे बळी टाळता आले असते.

भारत जोडो विशेष महिला पदयात्रा
महिलांची विशेष पदयात्रा काढून शनिवारी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती भारत जोडो यात्रेने मोठया उत्साहात साजरी केली. राहुल गांधीसोबत शेगाव येथून महिला मोठ्याप्रमाणात सहभागी झाल्या. काही महिलांनी भरजरी फेटे बांधले होते. तर काहींनी आकर्षक वेशभूषा केल्या होत्या. यात्रा मार्गावर ग्रामीण भागात महिलावर्ग हजारोंच्या संख्येने स्वागतासाठी उभा होता. नागपूर येथील प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी नफिसा सिराज अहमद यांनी अस्सल मराठमोळी "नऊवारी" पोशाख केला होता. त्यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली होती. 

याबाबत त्या म्हणाल्या,"हिंदू - मुस्लिम वेगवेगळे नाहीत. आम्ही सर्व एकच आहोत, मराठी आहोत. या पोशाखातून मला महाराष्ट्राची संस्कृती दाखवून द्यायची होती.  इतरांच्यापेक्षा वेगळा पोशाख असल्याने मला राहुलजींनी बोलावून घेतले. त्यांची भेट झाली. समाधान वाटले. आता भारत जोडो यात्रेचा उद्धेश सुद्धा असाच पूर्ण होईल, याची खात्री वाटते," असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत वर्षाताई गुजर, आशाताई राऊळ, उषाताई कुकटे आणि अन्य सहकारी उपस्थित होत्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 733 casualties could have been avoided if PM had interacted with farmers Says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.