हर्षनंदन वाघ/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 28 - नवीन वर्षात अमरावती विभागातील हागणदारीमुक्त ७३३ गावात स्वछता अभियान राबविण्यात येणार असून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या अभियानातंर्गंत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीस पंचायत समितीस्तरावर बक्षिसाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून नवीन वर्षात अमरावती विभागात स्वच्छता अभियानाचा गजर होणार आहे. तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास राज्यात नवीन ओळख निर्माण करून दिली होती. त्यामुळे या अभियानाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली होती. या अभियानामुळे राज्यातील अनेक गावे स्वच्छ होवून आरोग्याचा नवा आदर्श ठेवण्यात आला होता. त्यामुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गंत हागदारीमुक्त झालेल्या गावांसाठी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीस पंचायत समितीस्तरावर बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता प्रथम बक्षीस २५ हजार रूपये ऐवजी १ लाख, व्दितीय १५ हजार ऐवजी ५० हजार, तृतीय १० हजारऐवजी २५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीस प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव सादर करणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी १ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात येणार आहे. तर बक्षीस पात्र ग्रामपंचायतीस २६ जानेवारी २०१७ रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय बक्षीस पात्र ग्रामपंचायतीस जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गंत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सहभागी सर्वाधिक २३५ हागदारीमुक्त ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील १५४, यवतमाळ जिल्ह्यातील १४१, अकोला जिल्ह्यातील १०३ व वाशिम जिल्ह्यातील १०० हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीपैकी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव दाखल केलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी १ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात येणार असून प्रथम, व्दितीय व तृतीय ग्रामपंचायतीस २६ जानेवारी २०१७ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.