- लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव (पुणे) : श्री संत तुकाराममहाराज व श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळ्यात या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात शासनाच्या १०८ टोल फ्री मोफत इमर्जन्शी अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारी काळात एका कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह ७५ अॅम्ब्युलन्स २४ तास सेवेसाठी सज्ज असणार आहेत. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या सोबत तीन-तीन रुग्णवाहिका असणार आहेत. वारीमध्ये या रुग्णवाहिका नेमक्या कोठे आहेत, हे माहिती व्हावे यासाठी पालखी मार्गावर माहिती पत्रके लावण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी दिंडीचालकांचे मोबाइल नंबर घेण्यात आले असून, त्याद्वारे त्यांच्याशी नियंत्रण कक्षातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी दिंडी चालकांनी हे नंबर संबंधित पालखी सोहळ्यातील प्रमुखांकडे किंवा कार्यालयात अथवा बीव्हीजी नियंत्रण कक्षाकडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वारीतील एखाद्या रुग्णाला तातडीने गरज लागल्यास त्यांना ही सेवा तातडीने मिळावी यासाठी १०८ नंबरवर डायल करावे लागणार आहे. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असल्याने केव्हाही रुग्णांना सेवा देता येणार आहे. ७५ रुग्णवाहिका या पालखी मार्गावर ठिकठिकाणी आपापल्या कार्यक्षेत्रात टप्प्याटप्प्यावर सहभागी होणार आहेत.