मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत बेशिस्तीचे वर्तन घडविण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईचा बडगा महामार्ग पोलिसांकडून उचलण्यात येत असून, २0१६ मध्ये केलेल्या कारवाईत ७५ लाखांपेक्षा जास्त वाहन चालक जाळ्यात अडकले असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, केलेल्या दंडात्मक कारवाईत ११३ कोटी रुपये दंडवसुली करण्यात आली आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. या महामार्गांवर वाहन चालकांकडून कोणत्याही प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि त्यामुळे अपघातांना निमंत्रण देता कामा नये, यासाठी महामार्ग पोलिसांकडून कठोर कारवाईही केली जाते. महामार्गांवर धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, जादा वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, विना हेल्मेट वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे, डार्क ग्लास, विना लाइट वाहन चालवणे इत्यादी वाहतूक नियम उल्लंघनाच्या केसेस चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दाखल केल्या जातात. तरीही वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी होताना दिसत नाही. २0१६ मध्ये केलेल्या कारवाईत ७५ लाख ७२ हजार ३२७ केसेसची नोंद महामार्ग वाहतूक पोलिसांकडे झाली आहे. यात चालकांवर केलेल्या कारवाईत ११३ कोटी ६ लाख रुपये दंड वसूल केला आहे. २0१४ मध्ये ६४ लाखांहून अधिक प्रकरणे दाखल झाली होती. (प्रतिनिधी)
राज्यात ७५ लाख ‘बेशिस्त’वाहन चालक
By admin | Published: March 25, 2017 2:35 AM