अकोला - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून महायुतीमध्ये योग्य समन्वय असून, भाजपकडून ७५ टक्के जागांचा तिढा सोडविण्यात आला आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यास संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यामुळे राज्यात १२ ते १३ जागांवर भाजपचे उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले. दुसरीकडे, राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा करत असल्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आल्याची टीका बावनकुळे यांनी केली
मराठा आरक्षणावर तोडगा निघेल
मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, या संवेदनशील मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे व जरांगे-पाटील एकत्र बसून तोडगा काढतील, असे सांगून मराठा समाजाला महायुती सरकारच्या कालावधीतच १० टक्के आरक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.