जमीर काझी, मुंबईपुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्याचा पूर्ण उलगडा करण्यात अद्याप तपास यंत्रणेला यश आले नसले, तरी त्याबाबत न्यायालयात दाखल आरोपपत्राच्या अनुषंगाने आवश्यक पूर्तता गृहविभागाकडून करण्यात येत आहे. सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यात सुनावणीच्या प्रति दिवसासाठी विशेष सरकारी वकिलांना ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अॅड. पानसरे यांच्या हत्येच्या गांभीर्यामुळे सरकारी वकिलांना परिणामकारक (महत्त्वाच्या) सुनावणीसाठी इतके शुल्क (फी) दिले जाणार असल्याचे विधि व न्याय विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.विशेष तपास पथकाने (एसआयटी) नऊ महिन्यांपूर्वी स्थानिक सत्र न्यायालयात सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या प्रकरणी साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या खटल्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करावे लागणार आहे. ‘खटल्याच्या कामकाजातील त्यांच्या सुनावणीचे शुल्क गृहविभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार, या केसच्या अनुषंगाने दंडाधिकारी, जिल्हा व सत्र आणि उच्च न्यायालयात चालणाऱ्या प्रत्येक परिणामकारक सुनावणीसाठी दिवसाला ७५ हजार रुपये फी दिली जाणार असल्याचे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामकारक सुनावणीच्या दिवसांची संख्या निश्चित करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.
सरकारी वकिलांना प्रतिदिन ७५ हजार फी
By admin | Published: September 07, 2016 5:43 AM