कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत आतापर्यंत सात हजार ५०९ जणांना तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी १९ रुग्ण मलेरियाचे आहेत. मात्र, वातावरण बदलामुळे ‘व्हायरल फिव्हर’ सगळीकडेच असतो, असे सांगून साथ नसल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेच्या प्रसिद्धिपत्रकात तापाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा सात हजार ५०९ इतका आहे. त्यात मलेरियाची लागण झालेल्यांची संख्या केवळ १९ इतकी आहे. सात हजार ५०९ रुग्णांचे रक्ताचे नमुने महापालिकेने गोळा केले आहेत. त्यासाठी जवळपास एक लाख ५७ हजार घरांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मात्र, कावीळ, डेंग्यू, गॅस्ट्रोचे किती रुग्ण आहेत, याची माहिती न देता शहरातील साथींचे वास्तव लपवण्याचा एक प्रयत्नच महापालिकेने केला आहे.मे महिन्यात पाणीटंचाई असताना कल्याण पूर्वेत दूषित पाण्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. कल्याण पूर्वेत मे महिन्यात कावीळची लागण झालेल्यांचा आकडा ७५ होता. त्यानंतर, १ ते १४ जुलैदरम्यान गॅस्ट्रो १७, कावीळ ४१ तर २७ जणांना विषमज्वराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ही महापालिकेचीच आकडेवारी आहे. त्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा नमूद करण्यात आलेला नाही. दूषित पाण्यामुळे काविळीची लागण झाल्याचा मुद्दा कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला होता. स्वच्छता योग्य प्रकारे केली जात नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला होता. महापालिकेने तयार केलेल्या साथरोग कृती आराखड्याची अंमलबजावणीही होत नाही, असा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. परिणामी, साथीच्या रोगांचे रुग्ण वाढत आहेत.आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले की, २७ गावांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा प्रत्यक्षात जास्त आहे. किमान १० जणांना ग्रामीण भागात डेंग्यूची लागण झाल्याचे वाटते. त्याला डॉक्टरांनी दुजोरा दिलेला नाही. ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. इमारतींमध्ये तापाचे रुग्ण कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>महासभा गाजणारमहापालिकेतील भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शैलेश धात्रक यांनी सोमवार, १८ जुलैला महापालिकेच्या महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर उघड्यावर पदार्थ बनवून विकले जातात. त्यामुळे पावसाळ्यात साथीच्या रोगांना आमंत्रण मिळते. या गाड्या बंद करण्याची लेखी व तोेंडी तक्रार देऊनही प्रभाग अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. जोपर्यंत उघड्यावर पदार्थ विकणाऱ्यांविरोधात पालिकेकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत सभा तहकूब करावी, अशी मागणी धात्रक यांनी केली आहे.
कल्याण-डोंबिवलीत तापाचे ७,५०९ रुग्ण
By admin | Published: July 18, 2016 4:52 AM