लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान रविवारी पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी ७६ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी होणार आहे.
शिंदे-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा १२ ऑगस्ट रोजी केली होती. त्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात ५४७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ६६.१० टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.