ठाणे : जव्हेरी बाजारातील सोने-चांदीच्या दुकानातून सलग ७ वर्षे चांदी चोरणाऱ्या दुकानातील कर्मचाऱ्याकडून ९० लाख रुपये किमतीची १९८ किलो चांदी ठाणे पोलिसांनी गुरुवारी जप्त केली. मुंबईतील जव्हेरी बाजारातील बिलियन अँड ट्रेडर्स या सोने-चांदीच्या दुकानात ठाण्यातील इंदिरानगरातील रतनसिंग भवरसिंग देवरा (वय २५) हा विक्री प्रतिनिधी म्हणून कामाला होता. त्याने तिजोरीची बनावट चावी तयार केली. सुट्टीच्या दिवशी तो दुकानातून चांदीच्या लहान-सहान वस्तू लंपास करायचा. ७ वर्षांपासून तो चोरीचे काम करत होता. ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना खबऱ्याने ही माहिती देताच, गुरुवारी आरोपीच्या अटकेसाठी इंदिरानगरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेऊन मूर्ती, शिक्के, ताट, आदींसह १९८ किलो चांदी जप्त केली. चोरीच्या चांदीतून स्वत:चे शोरूम थाटण्याचे स्वप्न होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दुकानाचे मालक अनिल डागलिया यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
ठाण्यात १९८ किलो चांदी जप्त!
By admin | Published: March 25, 2017 2:21 AM