लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या फेरीत ७९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागातर्फे देण्यात आली आहे, तर तब्बल ७५ हजार ९३७ विद्यार्थ्यांचे पहिल्या यादीत नाव आले असूनही त्यांनी प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही.अकरावी प्रवेशाची पहिली यादी सोमवार, १० जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती, पण नवीन कंपनीच्या दिरंगाईमुळे मध्यरात्रीपर्यंत संकेतस्थळावर डेटा अपलोड झालेला नव्हता. त्यामुळे पहिली यादी रात्री १ वाजता संकेतस्थळावर जाहीर झाली. त्यानंतरही गोंधळ कायम होता. अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेशाचे मेसेज आले नव्हते. विद्यार्थी आणि पालकांनी यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर, गुरुवारी संपणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वाणिज्य शाखेत सर्वाधिक म्हणजे, ९२ हजार ८३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला होता. त्यापैकी फक्त ४३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत ४७ हजार ४२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी २६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, २० हजार ५५३ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला १ हजार ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पसंतीच्या महाविद्यालयालाच विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सोमवार, १७ जुलैला सायंकाळी ५ वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे. दुसरी यादी वेळेत जाहीर होईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. >पहिल्या यादीत दीड लाख विद्यार्थ्यांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत तब्बल १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांची नावे होती. त्यापैकी ७५ हजार ९३७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. ८५४ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, २४२ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. कला शाखेत पहिल्या यादीत एकूण १५ हजार ९१२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी ९ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ६ हजार ७४७ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागीच झाले नाहीत. ४० विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले असून, ३१ जणांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
अकरावीत घेतले ७९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश
By admin | Published: July 15, 2017 5:23 AM