हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: येत्या जूनमध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर व ठाणे ही शहरे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केली जातील. छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत दोन वर्षांच्या अटीतटीच्या स्पर्धेनंतर जून २०१८ मध्ये १०० शहरांची यासाठी निवड करण्यात आली. यात राज्यातील आठ शहरांचा समावेश आहे. १७४०२ कोटी खर्चून राज्यात आठ शहरांत ३२० प्रकल्प सुरू केले. करण्यात आले. यापैकी २३६ प्रकल्प जवळपास पूर्ण झाले. उर्वरित ८४ वेळेत पूर्णत्वास जाऊ शकतात.
सर्वाधिक प्रकल्प ठाणे (५३), नाशिक (५०), सोलापूर (४९) आणि पुणे (४८) येथे आहेत. छत्रपती संभाजीनगरला ४६ प्रकल्पांसाठी ३,५४७ कोटी तर नाशिकला ३,१४० कोटीं निधी व त्यापाठोपाठ ठाण्याला २८७४ कोटी मिळाले.
सोलापूरला सर्वात कमी निधी
- नागपूरमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची गती किंचित संथ दिसते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिग्गज नेते येथील असूनही १,९७२ कोटी मिळाले. सोलापूरला ४९ प्रकल्प असूनही सर्वात कमी १२५८ कोटींचा निधी दिला आहे.
- ३ मार्च २०२३ पर्यंत केंद्र व राज्याच्या ५,८१३ कोटींपैकी ५,३१४ कोटींचा वापर करून महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली. यंदा ८ शहरांवर ८००० कोटींचा निधी खर्च केला जाईल.
निधीच्या वापरात उल्लेखनीय कामगिरी
निर्माणाधीन प्रकल्प - पूर्ण झालेले - एकूण प्रकल्प - खर्च (रुपयांमध्ये)
- छ. संभाजीनगर ११ ३५ ४६ ३,५४७
- कल्याण-डोंबिवली ९ ९ १८ १,४८३
- नागपूर २३ ८ ३१ १,९७२
- नाशिक १० ४० ५० ३,१४०
- पिंपरी-चिंचवड ८ १७ २५ १,३०५
- पुणे ३ ४५ ४८ १,८२३
- सोलापूर ७ ४२ ४९ १,२५८
- ठाणे १३ ४० ५३ २,८७४
- एकूण ८४ २३६ ३२० १७,४०२