सचिन कांबळे
पंढरपूर : पूर येण्यापूर्वी एक दिवस अगोदर गाव सोडलं... आणि नेमके दुसºयाच दिवशी पुराची वार्ता कानी पडली. गेल्या दहा दिवसांपासून आम्ही पंढरीत अगदी सुखरूप आहोत. गावाकडची काळजी लागली आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून नातलगांना सांगणं आहे, आमची काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी, घ्या अशा शब्दात श्रावण वारीच्या निमित्तानं पंढरीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड भागातून आलेल्यांनी ‘लोकमत’शी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) येथून दरवर्षी श्रावण महिन्यात ‘श्रावण वारी’ पायी दिंडी सोहळा पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो. त्याप्रमणे याही वर्षी १७० वारक ºयांनी ४ आॅगस्टला सकाळी ६ वाजता गाव सोडले. हा दिंडी सोहळा मालगाव (ता. मिरज), कुची (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), जुनोनी, कमलापूर (ता. सांगोला), खर्डी (ता. पंढरपूर) या मार्गाने ९ आॅगस्ट रोजी पंढरपुरात पोहोचला. पंढरपूर येथील रंगनाथ महाराज-परभणीकर गुरुजी मठामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवार (१२ आॅगस्ट) असा मुक्काम होता. या चार दिवसांच्या कालावधीत चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन व नैवेद्य, नगर प्रदक्षिणा, कालाप्रसाद करून पुन्हा हेरवाडकडे परतीचा प्रवास सुरू होतो. गेल्या दहा दिवसांपासून हा दिंडी सोहळा गावापासून दूर असल्याने दिंडीतील वारकरी आणि गावाकडील मंडळी दोघांनाही काळजी लागली. पुरामुळे त्यांचा पंढरपुरातच मुक्काम वाढला. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडील पैसे संपल्यामुळे दिंडीतील १७० भाविकांच्या भोजनाची व राहण्याची सोय कशी करायची, असे प्रश्न पडला.
त्यावेळी ते मुक्कामी असलेल्या मठाजवळील श्री शिवछत्रपती तरुण मंडळाचे कार्यकर्ते राजू मिसाळ यांच्यासमवेत या दिंडीची सोय करण्याबाबत प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे या सर्व परिस्थितीची माहिती सांगितली. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भोजनाची व राहण्याची सोय करून दिली. त्यांच्या रूपाने पांडुरंगच आम्हाला भेटला, अशा शब्दात दिंडी प्रमुख दिलीप बाळगुंडा-पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विठुरायाचे दर्शन झाले, पण आता पुरामुळे घरांची काय स्थिती झाली असेल याची विवंचना या ग्रामस्थांना लागली आहे.
५ फूट उंचीवर साहित्य ठेवून सोडले घर- दरवर्षीच मी प्रत्येक वर्षी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी यात्रा करते. यंदाच्या वर्षी पूर येण्याचा अंदाज होता. यामुळे पुराचे पाणी घरात येण्याचा अंदाज घेऊन ५ फूट उंचीवर घरातील साहित्य ठेवून यात्रेसाठी निघालो होतो. मात्र पूर मोठ्या प्रमाणात असल्याने घरात अधिक पाणी साठले व घरातील सर्व साहित्य खराब झाले असल्याचे हेरवाडच्या आवाका कोरूचे यांनी सांगितले.
पूर येण्यापूर्वी गावातून निघालो. पूर आल्याची बातमी आम्हाला समजली. त्यानंतर दिंडीतील वारकºयांना कुणाला माघारी जाण्याची इच्छा आहे का? अशी विचारणा केली, मात्र कोणीही माघारी जाण्यास तयार झाले नाही. यामुळे हा यात्रा सोहळा पूर्ण झाला आहे.- दिलीप बाळगुंडा पाटील, दिंडी प्रमुख, श्रावण वारी पायी दिंडी सोहळा
गावात गेल्यावर राहायचे कुठे?- हेरवाड गावात सर्व मातीची घरे आहेत. आमचे घर देखील मातीचे होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे घर कोसळले असे समजले. यामुळे आता गेल्यावर राहायचे कुठे असा प्रश्न आहे, असे धोंडिराम पांडुरंग घोरपडे यांनी सांगितले.
मंदिर समितीकडून भोजन व्यवस्थाहेरवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे पूर आल्याने येथील लोक पंढरपुरात अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील पैसे संपले आहेत. त्यांना निवास आणि भोजनाची अडचण निर्माण झाल्याचे समजताच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी मंदिर समितीच्या वतीने श्रावण वारी पायी दिंडी सोहळ्यातील १७० भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.