मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची मंगळवारी सुमारे ८ तास कसून चौकशी केली. सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले परब सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. एनआयएच्या अटकेत असलेला बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने १०० कोटींची वसुली आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने अधिकारी त्यांच्याकडे कसून चौकशी करीत असल्याचे समजते. कार्यालयाच्या परिसरात शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपण सविस्तर उत्तरे दिली आहेत. चौकशीसाठी आपण पूर्ण सहकार्य करत आहोत. ईडी सरकारी संस्था असल्याने आपण त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देण्यास जबाबदार आहोत. मात्र व्यक्तिगत आरोपांना कोणतेही उत्तर देणार नाही, असे परब यांनी चौकशीनंतर माध्यमाशी बोलताना सांगितले. मात्र कोणत्या विषयावर चौकशी केली हे मात्र स्पष्ट केले नाही.
‘काेणतीही चूक नाही’ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होण्यापूर्वी अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘मी काहीही चूक केलेली नाही. पण ईडीने मला कोणत्या कारणासाठी समन्स बजावले आहे, याची माहिती नाही. मी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जात आहे. मला जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे देणार. मी शिवसेनाप्रमुखांची व माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितलं होतं, मी काेणतीही चूक केलेली नाही.