ठाणे : भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य बनविण्यासाठी लागणाऱ्या सुमारे १० लाख ७० हजार ७९० रुपयांचा २० हजार लीटर स्पिरीटचा साठा एका गॅसच्या टँकरमधून महाराष्ट्रात येत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने पनवेल - तळोजा मार्गावर शुक्रवारी दुपारी पकडला. टँकरसह महाराष्ट्रातील उत्पादन शुल्क मिळून ९५ लाख ७० हजार ७९० इतकी या मालाची किंमत आहे. याप्रकरणी टँकर चालक संतोष चोवडेय्याला अटक करण्यात आली.इंडियन आॅइलच्या एका गॅसच्या टँकरमधून परराज्यातून महाराष्ट्रात अवैध स्पिरीटची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट राज्य भरारी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मुकुंद बिलोलीकर आणि सुभाष जाधव यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सिंघल, संचालक डॉ. बी जी शेखर आदींनी सापळा रचून शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास या टँकरला पकडले. चौकशीत चालकाने त्यात गॅस असल्याचे सांगितले. मात्र नंतर स्पिरीटचा साठा असल्याची कबूली दिली. याप्रकरणी महेश कार्गो आणि नागराज असे तिघे पसार असल्याची महिती पोलिसांनी दिली. स्पिरीटचा हा साठा एखाद्या बनावट मद्य तयार करणाऱ्या कारखान्यात नेला जात होता का, त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. यामध्ये आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याची शक्यताही वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
८० लाख किमतीचे स्पिरीट पकडले
By admin | Published: November 14, 2015 3:33 AM