गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा गावशेजारील मसरामटोला येथे आसिफ गोंडील या शेतक-याच्या शेतात रविवारी (दि.६) बिबट्याचा बछडा आढळला. यावेळी तीन जणांनी बछड्याच्या शेपटीला धरुन फरफटत नेले. यात बछडा जखमी झाली. त्यानंतर उपचारादरम्यान मंगळवारी सदर बछड्याचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हिडियो बुधवारी (दि.९) व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने आसिफ गोंडील, प्रकाश पुराम,लोकेश कापगते या तीन जणांवर वन्यजीव अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना ही शुक्रवार (दि.११) पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा कोयलारी परिसरातील मसरामटोला येथील आसिफ गोंडील यांच्या शेतात एक बिबट्याच्या बछडा आढळून आल्याची घटना रविवारी (दि.६) दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. गोंडील हे त्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील मोहाच्या झाडाजवळ बिबट्याचा एक बछडा सुन्न अवस्थेत आढळला. दरम्यान, तीन जणांनी या बछड्याला जीवदान देण्याच्या उद्देशाने शेपटीला धरुन फरफटत नेले. परिणामी बछडा गंभीर जखमी झाला होता.
या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी मिळताच सडक अर्जुनीचे वनक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड हे कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच बछड्याला ताब्यात घेत उपचारासाठी साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविले. या बछड्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.८) या बछड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बछड्याच्या शेपटीला धरुन फरफटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर वन विभागाने आसिफ गोंडील, प्रकाश पुराम, लोकेश कापगत या तिघांवर गुन्हा दाखल केला. तसेच, तिघांना ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांनी शुक्रवारपर्यंत वनकोठडी सुनावली असल्याचे वनक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.