सिंधुदुर्ग : मालवणच्या तेली पाणंद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले सात महाविद्यालयीन विद्यार्थी व एक प्राध्यापक असे आठ जण शनिवारी बुडून मरण पावले. समुद्रात भरती असल्याने ही दुर्घटना घडली. ते बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. दुर्घटनेतून तिघांना वाचविण्यात यश आले. दोन प्राध्यापकांसह हे ४७ विद्यार्थी कोकण दर्शन सहलीसाठी निघाले. पुण्याच्या औद्योगिक प्रकल्पाला व महाबळेश्वरला भेट देऊन ते शनिवारी मालवणला आले. सिंधुदुर्ग किल्ला पाहून ते वायरी किनाऱ्यावर आले. भरतीमुळे स्थानिकांनी पाण्यात न जाण्याच्या सूचना केल्या. तरीही सर्व ४७ जण समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ११ जण बुडू लागले. सहकाऱ्यांनी आरडाओरडा करताच स्थानिक मच्छीमार व स्कूबा ड्रायव्हरनी त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचे नातेवाईक सायंकाळी उशिरा येथे आले असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आपत्कालीन यंत्रणा ‘फेल’- स्थानिकांनी जीव धोक्यात घालून पर्यटकांना समुद्राबाहेर काढले. मात्र, रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. - ‘किनाऱ्यावर जीवरक्षक नेमले खरे, पण त्यांना लागणाऱ्या आवश्यक साहित्याची पूर्तता झाली नाही, मग धोकादायक स्थितीत पर्यटकांचे जीव वाचवायचे कसे,’ असा सवालही त्यांनी केला. - सहलीसाठी महाविद्यालयाकडून परवानगी घेतली नव्हती. विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक परस्पर मालवणला गेल्याचा खुलासा इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य उडुपी यांनी केला. मृतांची नावे...प्राध्यापक महेश कुडुचकर (वय ३५) तसेच नितीन मुनतवाडकर (२२), मुजमिल हन्नीकेरी (२२), किरण खांडेकर (२२), अवधूत ताशीलदार (२२), माया कोल्हे (२२), करुणा बेर्डे (२१) आणि आरती चव्हाण (२२)- मच्छीमार व स्कूबा डायव्हर यांच्या मदतीमुळे संकेत गाडवी (२३), अनिता हानळी (२२), आकांक्षा घाटगे (२२) यांना वाचविण्यात आले. आकांक्षाची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालवणच्या समुद्रात ८ जण बुडाले
By admin | Published: April 16, 2017 4:47 AM