मुंबई : ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना रिक्षा-टॅक्सी युनियनकडून जरी विरोध करण्यात येत असला तरी या खासगी सेवांना ग्राहकांकडून पसंती देण्यात येत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने मुंबईसह देशभरातील निवडक शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ८0 टक्के प्रवाशांनी खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांबाबत समाधान व्यक्त केल्याचे समोर आले आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार हे त्रासदायक असल्याचे ९४ टक्के लोकांनी सांगितले आहे. ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना विरोध करत रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात येते. त्यासाठी प्रवाशांनाही वेठीस धरले जाते. यावर तोडगा काढण्याची मागणी युनियनकडून केली जाताच केंद्राकडून नियमावली करण्यात येत असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली होती. ओला, उबरविरोधात काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षांचा होणारा संघर्ष पाहता ग्राहकांच्या भावना जाणून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीनेच पुढाकार घेत आॅनलाइन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, पुणे, नाशिक, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आदी शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ७६ हजार १६९ नागरिकांनी भाग घेतला. रोज ओला, उबरची सेवा वापरणारे ८,४६३ म्हणजेच ११ टक्के लोक होते. तर २१ टक्के लोक क्वचितच या सेवेचा वापर करतात. ३९ टक्के आठवड्यातून अनेकदा या सेवा वापरतात. ४७ टक्के लोकांच्या मते रिक्षा-टॅक्सी व मेरु-टॅब यांच्या तुलनेत ओला-उबरचे दर कमी आहेत. ओला-उबर आदी कंपन्यांच्या चालकांचे वर्तन चांगले असल्याचा अनुभव ५१ हजारांहून अधिक ग्राहकांना आला आहे. १४ हजार ७२४ ग्राहकांनी या कंपन्यांच्या चालकांचे वर्तन आवडले नसल्याचे मत नोंदविले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या वर्तनाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २८ हजार ५२९ ग्राहकांनी टॅक्सी चालकांचे तर ३५ हजार ९७0 ग्राहकांनी रिक्षा चालकांचे वर्तन वाईट असल्याचे सांगितले आहे. ६,७२४ ग्राहकांनी रिक्षाचालक आणि ६,२0९ ग्राहकांनी टॅक्सीचालकांची वर्तवणूक उत्तम असल्याचे मत नोंदविले आहे. (प्रतिनिधी)>भाडे नाकारण्याने त्रस्तरिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याने प्रवासी त्रास्त आहेत. ७१ हजार ७२६ म्हणजेच ९४ टक्के लोकांनी अशी तक्रार केली. तर ६ टक्के लोकांनी त्रस्त नसल्याचे मत नोंदविले.
ओला, उबरबाबत ८0 टक्के प्रवासी समाधानी
By admin | Published: September 21, 2016 5:58 AM