मुंबई : मागील दोन महिने आमच्या पक्षाकडे येणाऱ्या लोकांची आवक वाढली आहे. आमच्याकडे येणारे ८० टक्के लोक भाजपमधून येत आहेत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.
शिस्तीचा पुरस्कार करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या त्या पक्षातून लोक आता बाहेर पडत आहेत. जुन्या काळातील जनसंघ किंवा भाजपचा कार्यकर्ता संघटनेची चौकट मोडून कधीही बाहेर जाणारा नव्हता, त्याचे कारण तेव्हाचे नेतृत्व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारे होते. आज ही स्थिती राहिलेली नाही. ठराविक लोकांच्या हातात सत्ता ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक बाहेर पडत आहेत, हा अनुभव त्याच पक्षातील एका नेत्याने मला सांगितल्याचेही पवार म्हणाले.
भाजपचे चरण वाघमारे शरद पवार गटात -मुंबई : भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. वाघमारे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचे शरद पवार यांनी पक्षात स्वागत केले.