मुंबई : राज्यातील विविध कारागृहांत कार्यरत असलेल्या अधिकारी व रक्षकांना आता त्यांना आपल्या आजारावरील उपचारासाठी वैद्यकीय अग्रीम (आगाऊ रक्कम) मिळण्याची शक्यता दुरापस्त बनली आहे. त्यासाठी जेल कुटुंब कल्याण निधीपैकी (वेल्फेअर फंड) तब्बल ८० टक्के निधी परत मुख्यालयाकडे पाठविला जाणार आहे.पोलिसांच्या धर्तीवर तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आल्याने, मंजूर करण्यात आलेली रक्कम परत मागविण्यात आलेली आहे.
आपल्यावरील उपचारासाठी वैद्यकीय आगाऊ रकमेची मागणी करणाऱ्या अधिकारी व रक्षकांना ती न देता, त्यांना मोफत आरोग्य कुटुंब योजनेंतर्गत उपचार करून घेण्यासाठी आग्रह धरा, अशा सूचना कारागृह विभागाचे महानिरीक्षक डॉ.भूषण कुमार उपाध्याय यांनी राज्यातील सर्व कारागृह अधीक्षक व कार्यालयीन प्रमुखांना केलेली आहे.त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार असल्याने, उपचारासाठीची आगाऊ रक्कम मिळणे अशक्यप्राय होणार आहे. (प्रतिनिधी)