नीलेश भगत
यवतमाळ, दि. २३ : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूच्या पदकाकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले असताना यवतमाळकरांच्या ८० वर्षापूर्वी झालेल्या आॅलिम्पिकच्या आठवणी ताज्या झाल्या. १९३६ साली जर्मनीच्या बर्लिंन येथे झालेल्या आॅलिम्पिकमध्ये यवतमाळच्या तरुणांनी यशाचा झेंडा रोवला होता. एवढेच नाही तर जर्मनीचा हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलर यांनी स्वस्तिक आकाराचे प्लॅटिनम मेडल स्वत:च्या हाताने यवतमाळच्या खेळाडूंना प्रदान केले होते. ते खेळाडू बंधू म्हणजे डॉ.सिद्धनाथ कृष्णाजी काणे व श्रीपाद दत्तात्रय काणे होय.
यवतमाळचे धनवंतरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मधुसुदन काणे यांचे वडील असलेल्या सिद्धनाथ काणे यांनी आपल्या अंगभूत क्रीडा गुणांच्या कौशल्याने बर्लिंनमध्ये हिटलरलाही प्रभावित केले होते. बर्लिंनमध्ये आॅलिम्पिकमध्ये भारताला कबड्डी, मलखांब व आट्यापाट्या या खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आमंत्रित केले होते. या अस्सल देशी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्याची जबाबदारी अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळावर होती. त्यांनी बर्लिंनला जाण्यासाठी २५ खेळाडूंचे पथक तयार केले. या पथकाचे नेतृत्व डॉ. सिद्धनाथ काणे यांच्याकडे होते. याच पथकात त्यांचे बंधू श्रीपाद दत्तात्रय काणे खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. या चमूने दंडबैठका, मलखांब, वेताचा मलखांब, गदगाफरी, योगा, आट्यापाट्या, खो-खो या खेळाचे सादरीकरण केले. डॉ. सिद्धनाथ काणे यांनी यावेळी भारतीय व्यायाम पद्धतीचे महत्व व महानता यावर बर्लिंनमध्ये अस्खलीत इंग्रजीतून भाषण केले. या भाषणाचा अनुवाद त्यावेळी जगभरातील अनेक भाषांमधून करण्यात आला होता. हिटलर म्हणाले, हा देश पारतंत्र्यात कसा ?डॉ. काणे यांच्या चमूने जेव्हा कबड्डीचे प्रात्यक्षिक दाखविले तेव्हा जर्मनीचा हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलर व त्याचा सहकारी गोबेल्स उपस्थित होता. प्रात्यक्षिक पाहिल्यावर हिटलर म्हणाले, ह्यमला आश्चर्य वाटते की, ज्या देशाचा एक खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या पाच-सहा खेळाडूंंना ओढून आणण्याची क्षमता ठेवतो तो देश इतक्या वर्षांपासून पारतंत्र्यात कसा राहू शकतोह्ण सिद्धनाथ काणे यांच्या खेळाने प्रभावित झालेल्या हिटलरने त्यांचा स्वस्तिक आकाराचे प्लॅटिनम मेडल स्वत:च्या हाताने प्रदान केले होते. यंदा रिओमध्ये यवतमाळचा डॉक्टरआॅलिम्पिकमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. परंतु प्रत्येकाचे हे स्वप्न खेळाच्या रुपाने पूर्ण होईल याची खात्री नसते. यवतमाळच्या डॉ. राकेश चकुले या डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून रिओ आॅलिम्पिकमध्ये निवड झाली. तब्बल ८० वर्षानंतर यवतमाळचा तरुण पुन्हा आॅलिम्पिकमध्ये जात आहे. तर आकाश अनिल चिकटे या हॉकीपटूला आॅलिम्पिकने हुलकावणी दिली. आॅलिम्पिकसाठी निवडलेल्या ३२ जणांच्या संभाव्य संघात त्याचा समावेश होता. परंतु दुर्दैवाने त्याची रिओसाठी निवड झाली नाही.