दिवा- एकनाथ शिंदे समर्थकांची हकालपट्टी करण्याची मालिका सुरू असताना अशा कारवाईंना आम्ही घाबरत नाही असे म्हणत दिव्यातील सुमारे ८०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. यामध्ये दिव्यातील सर्व आठही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी या सर्व समर्थकांनी दिव्यात शक्तिप्रदर्शनही केले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सर्वप्रथम माजी महापौर नरेश म्हस्के यांनी जाहिर पाठींबा दिला. त्यानंतर त्यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. दुसNयाच दिवशी पुन्हा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचीही हकालपट्टी शिवसेनेतून झाली. त्यामुळे ठाण्यात शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यातूनच दिवा येथे बुधवारी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यामध्ये नगरसेवक, शहरप्रमुखापासून ते शाखाप्रमुखांपर्यंतचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शक्तिप्रदर्शनानंतर मातोश्रीवरून हकालपट्टीचे पत्र येऊ शकते. त्यामुळे त्याआधीच आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापालिका क्षेत्रात असूनही दिवा शहर नेहमीच विकासकामांसाठी उपेक्षित राहिले होते. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून येथे अनेक विकास कामे होत आहेत. म्हणूनच गेल्या पालिका निवडणुकीत येथून शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले. मात्र यावेळी प्रभाग रचनेत एक नगरसेवक वाढण्याची अपेक्षा असतानाही राष्ट्रवादीच्या दबावामुळे ही संख्या कमी करण्यात आली. यावर शिंदे यांनी आक्षेप घेत या मतदारसंघात नगरसेवकाची संख्या एकने वाढवून घेतली. त्यामुळे आम्ही दिव्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी सांगितले.