मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने चार वर्षात शहरी व निमशहरी भागात राबविलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, परडवणारी घरे, शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, कौशल्य विकासअंतर्गत रोजगार क्षमता निर्माण करणे आदी विविध सामाजिक कल्याण आणि रोजगार उपक्रमाच्या अंमलबजावणीवर सुमारे ८१ टक्के जनता ही समाधानी असल्याचे हंसा रिसर्च व न्यूज 18- लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.शहरी व ग्रामीण भागातील सर्वात जास्त लोकांनी पायाभूतसुविधांबद्दल सर्वात जास्त समाधान व्यक्त केल्याचे दिसते. ग्रामीण, शहरी व निम भागातील जनतेला मेट्रो, विमानतळ, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, परवडणारी घरे, मुंबई गोवा महामार्गाचे काम, मुंबई, लहान शहरांमधील हवाई वाहतूक सुविधा, वांद्रे ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, न्हावा शेवा सागरी मार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, मिहान, नवी मुंबई विमानतळाची मंजुरी, वीज उत्पादन वाढविणे व वीज भारनियमन कमी करणे, घर खरेदीदारांसाठी महारेरा आदी पायाभूत सुविधांसाठी केलेल्या विविध योजनांबद्दल या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते.शेतकरी ते ग्राहक बाजार, शेतमाल विक्रीतील मध्यस्थ काढणे, किमत ठरविण्याची शेतकऱ्यांना मुभा या बाबत ८१ टक्के ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले. त्यातील ६२ टक्के अत्यंत समाधानी होते. पीक विम्याबद्दल ७८ शेतकरी समाधानी होते. शहरी व निम शहरी भागातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्गाच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांबद्दल ७८ ते ७९ टक्के जनतेचा कौल युती शासनाकडे आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरकारला पसंती देण्याचा टक्का वाढला आहे.
फडणवीस सरकारच्या कामगिरीला 81% जनतेची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:15 AM