पुणे : कंपनीच्या वेबपेजवर जाऊन कंपनीद्वारे पाठविलेल्या लिंक्सवर क्लिक करून घरबसल्या कमिशन मिळवा, अशी जाहिरात करून हजारो रुपये गुंतविण्यास भाग पाडून मध्य प्रदेशमधील कंपनीने पुण्यातील ५६ लोकांची ८२ लाखांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील दोघांना सायबर क्राइमच्या पथकाने उज्जैन येथून अटक केली आहे़ रामप्रकाश शिवराम गुप्ता (वय ३३, रा़ उज्जैन, मध्य प्रदेश) आणि धनंजय अजय शर्मा (वय २५, रा़ शक्तीनगर, उज्जैन, मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्याकडून २ मोबाइल, विविध बँकेचे ७ डेबिट कार्ड, ४ क्रेडिट कार्ड, २ पॅनकार्ड त्यापैकी एक एमटीएसआय अॅडव्हर्टायजिंग प्रा़ लि़ या कंपनीच्या नावे असलेला पॅनकार्ड आहे़ या कंपनीचा प्रमुख अमोल इनामदार असून, त्याने व प्रसन्ना हरणे यांनी मिळून ही कंपनी स्थापन केली होती़ याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, इनामदार याच्यावर उज्जैनमध्ये एप्रिल २०१५ मध्ये माधोनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती़ त्यात इतरांना अटकपूर्व जामीन मिळाला होता़ इनामदार जामीन मंजूर झाल्यानंतर फरार झाला आहे़ या प्रकरणी विशाल वसंत जाधव (वय ३१, रा़ शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यांना एमटीएसआय अॅडव्हर्टायजिंग कंपनीमधून मे २०१४ मध्ये फोन आला होता़ कंपनीच्या वेबसाइटवरील विविध गुंतवणुकीच्या वर्क फ्रॉम होम स्किम्सची माहिती दिली़ जाधव यांनी १५ हजार रुपये गुंतवले़ त्यांना त्यांचा युजर आयडी व पासवर्ड देण्यात आला़ त्यानंतर, कंपनीच्या वेबपेजवर त्यांना दररोज १०० लिंक्स पाठविण्यात येत होत्या़ त्या क्लिक करून साधारण १५ सेकंदांनी बंद करणे, अशा प्रकारचे कामाचे स्वरूप होते़ पहिल्या महिन्यांमध्ये २४ टक्के रिटर्न मिळाल्याने जाधव यांचा विश्वास बसला़ त्यांनी जून २०१४ मध्ये ५० हजार रुपये गुंतविले़ जुलै २०१४ मध्ये त्यांना कामाचे रिटर्न्स न मिळाल्याने, फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ काही दिवसांनी त्यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली़ या आरोपींनी ‘शॉपिंग सेन्स मार्केटिंग’ या नावाने नवीन कंपनी सुरू केली असून, आॅनलाइन शॉपिंगच्या अॅडव्हर्टाइझच्या नावाने मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून मेंबरशिप कार्ड दिले जात आहे़ या कंपनीचे जाळे पुणे, जम्मू काश्मीर, दिल्ली, हरियाणा व दक्षिण भारतामध्ये आहे़ (प्रतिनिधी)
‘वर्क फ्रॉम होम’ नावाने ८२ लाखांची फसवणूक
By admin | Published: June 19, 2016 12:54 AM