अमरावती : मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने वन्यप्राण्यांना जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे शिकार, विजेचा धक्का आणि रेल्वे, रस्ते अपघातात गेल्या सहा महिन्यांत राज्यात ८२ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल वन्यजीव सोसायटीने वन विभागाकडे सादर केला आहे. अमरावती व नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांना जीव गमवावा लागल्याची आकडेवारी आहे.शिकार, वणवा, रेल्वे अपघात व विहिरीत पडून जीव गमावलेल्या बिबट्यांचा आकडेवारीत समावेश आहे. वाघांच्या शिकारीनंतर बिबट्यांना लक्ष केले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिबट्याची कातडी, नखे, दात, अवयवांची तस्करी केली जाते. सन २०१८ मध्ये वनविभागाकडे सादर केलेल्या अहवालात बिबट्यांचा शिकारीसाठी खात्मा केल्याची बाब समोर आली आहे. काही ठिकाणी विषबाधा, मानव आणि वन्यजीव संघर्षातून बिबट्यांना जीव गमवावा लागला. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी रस्ते अपघातात पाच बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे करण्यात आली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष ही खेदजनक बाब असून, वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धनासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
कटनी अवयव तस्करीचे केंद्र काही वर्षांपूर्वी वाघांच्या अवयव तस्करीचे केंद्र असलेले मध्यप्रदेशातील कटनी हे आता बिबट्याच्या अवयव तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याची कातडी, दात, नखे आणि अवयवांची विल्हेवाट कटनी येथून लावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वनविभागाने वाघ संरक्षणाकडे लक्ष देतात शिकाऱ्यांनी आता बिबट्याच्या शिकारीकडे मोर्चा वळविला आहे.
विधिमंडळात तारांकित प्रश्नबिबट्यांचे बळी जात असल्याप्रकरणी आमदार राजू तोडसाम यांनी राज्य विधिमंडळात तारांकित प्रश्न सादर केला आहे. बिबट्यांच्या मृत्यूची कारणे, मानव अणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने केलेल्या उपाययोजना, शिकारी आदी विषयांवर त्यांनी बोट ठेवले आहे. या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने वनविभागाने बिबट्यांच्या मृत्यूची आकडेवारी विधिमंडळात माहिती पाठविली आहे.