मुंबई : राज्यात कोरोनाने सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम केले. बऱ्याच क्षेत्रांचे स्वरूपही पालटले. याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या सर्वेक्षणादरम्यान राज्यातील उच्च शिक्षण घेणाºया ८२ टक्के विद्यार्थ्यांना कोरोनामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून २७ टक्के विद्यार्थी भविष्यात शिक्षण सुरू ठेवण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे समोर आले आहे.राज्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ समुपदेशक व संशोधक आनंद मापुस्कर व बी.एन. जगताप यांनी Impact of Covid-19 Pandemic on Higher Education in Maharashtra हे सर्वेक्षण केले आहे. याअंतर्गत राज्याच्या कानाकोपºयातील उच्च शिक्षण घेणाºया जवळपास ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुगल अर्जाच्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यातील माहितीची नोंद करण्यात आली असून आर्थिक परिणाम, आॅनलाइन शिक्षणपद्धती, शिक्षकांचे योगदान, मास्क /सॅनिटायझर, अंतिम शाखेच्या परीक्षा, रोजगारक्षमता अशा विविध मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. अहवालात नोंदविलेल्या माहितीनुसार, ७३ टक्के विद्यार्थ्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे.मागील दोन महिने शिक्षण क्षेत्र आॅनलाइन लर्निंग स्वरूपात सुरू आहे. याविषयी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले असता, ९१ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन्स तर ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप व संगणक उपलब्ध आहेत. सहा टक्के विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन शिक्षण नियमित ठेवण्यासाठी कोणतेही डिव्हाइस उपलब्ध नाही. केवळ ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन शिक्षण पद्धत फायदेशीर असल्याचे मत मांडले. २६ टक्के विद्यार्थ्यांनी आॅफलाइन शिक्षण पद्धती आॅनलाइन पद्धतीला पर्याय असू शकत नाही, असे म्हटले आहे. ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीद्वारे शिक्षकांची मदत घेणे उपयुक्त असल्याचे, तर ४ टक्के विद्यार्थ्यांनी ही पद्धत आवडत नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय चार टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन शिक्षण घेत नसल्याचे म्हटले आहे.राज्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक वर्ष सहा महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, तर ४२ टक्के विद्यार्थ्यांचा याविषयी काहीच निर्णय झाला नसल्याचे अहवालात नमूद आहे. प्रोजेक्ट्स व इंटर्नशिपविषयी विद्यार्थ्यांना विचारले असता, ३७ टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रोजेक्ट्स व इंटर्नशिपला पसंती दर्शविली असून २४ टक्के विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट, इंटर्नशिप पुढच्या सहामाहीत घेण्याचा निर्णय घेतला आहे.४५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराची शाश्वती नाहीशिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या रोजगाराविषयी विचारले असताना ३७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळेल, असे मत व्यक्त केले, तर १७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळणार नाही, असे म्हटले आहे. ४५ टक्के विद्यार्थ्यांनी रोजगाराची कोणतीही शाश्वती नसल्याचे मत मांडले. याशिवाय ८२ टक्के विद्यार्थ्यांनी पदवीनंतरही रोजगाराच्या दृष्टिकोनातून कौशल्यविकास क्षेत्रात शिक्षणघेण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे.
घरचे अर्थकारण बिघडल्याने ८२ टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 3:28 AM