- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 20 - आपली सात लाखांची पॉलीसी आहे. तिचे काही पैसे भरायचे बाकी आहेत. ती लॅप्स (रद्द) होईल. ती लॅप्स न होण्यासाठी काही पैसे भरण्याचे अमिष अस्खलीत हिंदी किंवा इंग्रजीत बोलून ही चौकडी दाखवायची. भरलेले पैसे पुन्हा नव्या पॉलीसीमध्ये गुंतविण्यास भाग पाडून त्याच नावाखाली 84 लाखांची फसवणूक करणा:या देवेंद्रसिंह बिष्ट, प्रिया दुबे, अनुराधा शुक्ला आणि काजल पिंगा या चौकडीला नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. त्यांना 24 जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. वेगवेवगळया खासगी वीमा कंपन्यांमध्ये काम करणा:या या सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्या त्या वीमा कंपन्यांमधील ग्राहकांची इथ्यूंभूत माहिती मिळविली होती. याच माहितीच्या जोरावर वीम्याचे पैसे नभरले गेलेल्या ग्राहकांना ते हेरायचे. नौपाडयातील अशाच एका महिलेलाही त्यांनी हेरले. या महिलेने एका कंपनीची 27 लाखांची पॉलीसी काढली होती. त्यात त्यांनी पाच ते सहा लाख रुपये भरले होते. परंतू, आणखी काही रक्कम भरायची बाकी असल्यामुळे ही पॉलीसी रद्द होणार होती. ही माहिती देवेंद्रने 2013 मध्येच काढली. त्याच आधारे त्यांना पैसे भरल्यास तुमच्या पॉलीसीचे पुन्हा नूतनीकरण होईल, असे सांगण्यात आले. आपली पॉलीसी वाचेल आणि जादा पैसेही मिळतील, आशेपोटी या महिलेने सुमारे सात लाख रुपये भरले. त्याच पैशांत त्यांना आणखी पॉलीसी काढण्यास या टोळक्याने भाग पाडले. जादा पैसे मिळतील म्हणून त्यांनी आणखी रक्कम गुंतविली. आता त्यांची पॉलीसी सुमारे एक कोटींच्या घरात गेली. इतक्या मोठया रक्कमेचा परतावा मिळण्यासाठी काही प्रक्रीया शुल्क रोख स्वरुपात भरण्याचे त्यांना सांगण्यात आले. अशाप्रकारे वेगवेगळी नावे बदलून या महिलेकडून त्यांनी तब्बल 84 लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने 18 जून रोजी तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या चौघांनाही शिताफीने अटक केली. त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली, त्यांचेआणखी कोण साथीदार आहेत? याचीची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.आपला मुलगा करतो काय?84 लाखांच्या फसवणूक प्रकरणी देवेंद्रच्याला अटकेची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांना रविवारी रात्री दिली. ही माहिती मिळताच आपला मुलगा असे काही करीत असेल यावर बिष्ट कुटूंबियांचा आधी विश्वासच बसला नाही. पोलिसांसमोरच मुलाने आपल्या ह्यकर्तृत्वाह्णची कबूली दिल्यानंतर त्याच्या आईला याचा धक्काच बसला. तिला तिथेच भोवळ आली. पोलिसांनी तिला पाणी देत यापूर्वीच आपला मुलगा करतो काय? याकडे लक्ष द्यायला हवे होते, आता आम्हांला आमचे काम करु द्या आणि सहकार्य करा, असेही त्यांनी सांगितले.