अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्र हादरविणाऱ्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात तीन आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. बलात्कार, हत्या आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दोषारोपपत्रात ७० साक्षीदारांच्या जबाबांसह विविध प्रकारचे ३९ मुद्देमाल, फॉरेन्सिक लॅब व वैद्यकीय अहवालांचा तपशील आहे.१३ जुलैला कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्याचे राज्यात संतप्त पडसाद उमटले. महिनाभरात दोषारोपपत्र दाखल करु, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, घटनेनंतर ८५ दिवसानंतर तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयासमोर आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे (सर्व रा़ कोपर्डी) यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी सर्व पुरावे व अहवाल मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. आता याच महिन्यात खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे़ घटनेला १३ आॅक्टोबरला ९० दिवस पूर्ण होत आहेत. ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता असते. (प्रतिनिधी)>भक्कम पुरावेबाललैंगिक अत्याचार अधिनियमातील कलम २३ नुसार या गुन्ह्यातील तपशीलाबाबत पोलिसांना तसेच माध्यमांनाही भाष्य करता येत नाही. पोलिसांनी दोषारोपपत्राबाबत काहीही तपशील जाहीर केलेला नाही. गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या दृष्टीने भक्कम पुरावे मिळाले असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यासोबतही सल्लामसलत केली आहे.>उज्ज्वल निकम लढविणार खटला राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे फिर्यादीच्या वतीने खटला चालविणार आहेत़ जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी भेटीदरम्यान आश्वासन दिले होते़ त्यामुळे १५ दिवसांतच खटल्याची सुनावणी सुरू होईल, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. घटनाक्रम १३ जुलै सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खूनआरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे यास १५ जुलैला श्रीगोंदा येथे अटक १६ जुलैला दुसरा आरोपी संतोष भवाळ यास अटक१७ जुलैला पालकमंत्री राम शिंदे पीडित कुटुंबाला भेटले१७ जुलैला तिसरा आरोपी नितीन भैलुमे यास अटक १८ जुलैला दोघा आरोपींवर जिल्हा न्यायालयात हल्ला२० जुलैला कर्जत येथील विद्यार्थिनींकडून रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध २० जुलैला पुणे येथील पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोपर्डी येथे भेट २४ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपर्डीला भेट ७ आॅक्टोबरला तिघा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल गरज पडल्यास पुरवणी दोषारोपपत्र : पहिल्या आरोपीला अटक केल्यानंतर ८५ दिवसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे़ पुरावे एकत्र करणे, जबाब घेणे, वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय चाचण्यांचा अहवाल या कामांत वेळ गेला़ गरज पडल्यास पुरवणी दोषारोपत्र दाखल केले जाणार आहे.
कोपर्डीप्रकरणी ८५ दिवसांनी दोषारोपपत्र
By admin | Published: October 08, 2016 5:46 AM