जयंत धुळप, अलिबागएसटी बसमधून प्रवास करण्याकरिता समाजातील विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्याची योजना राज्य परिवहन मंडळाची आहे. २०१५ मध्ये एसटीच्या पेण-रामवाडी येथील रायगड विभागांतर्गत कार्यरत सर्व एसटी आगारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल ८५ लाख प्रवाशांनी या प्रवास भाडे सवलतीचा लाभ घेतला असल्याची माहिती एसटीच्या रायगड विभागाचे विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी या आपल्या ब्रीद वाक्यास जागून, राज्याच्या खेड्यापाड्यात पोहोचणारी राज्य परिवहन मंडळाची ‘एसटी’ बस म्हणजे राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची एक अत्यावश्यक सेवा आहे. ८५ लाख प्रवाशांमध्ये सर्वाधिक असे ४७ लाख १० हजार ३९२ लाभार्थी प्रवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. समाजातील ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा प्रवास करावा लागतो. त्यांचे आर्थिक उत्पन्न विचारात घेता त्यांच्यासाठी भाडे सवलत देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने गेल्या अनेक वर्षांपूर्वी घेतला आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येते.राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली शाळा, महाविद्यालयात पोहोचून शिक्षण घेण्याकरिता दररोज एसटी हेच एकमेव प्रवासाचे साधन आहे.ग्रामीण भागातील पालकांच्या आर्थिक उत्पन्नाचा विचार करता या पालकांनाआपल्या पाल्यांचा एसटीच्या प्रवासाचा दररोजचा प्रवास तिकीट खर्च भागवणे अनेकदा अशक्य होत असते. परिणामी विद्यार्थ्यांवर शालेय वा महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. ही समस्या महामंडळाने गांभीर्याने विचारात घेवून विद्यार्थ्यांकरिता एसटी प्रवास भाड्यात ६६.६६ टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा २०१५ मध्ये जिल्ह्यातील ३० लाख ६८ हजार ४११ विद्यार्थ्यांनी लाभ घेवून आपल्या आयुष्यातील शिक्षणाचा पुढील टप्पा गाठला आहे. विद्यार्थ्यांकरिता केवळ तिकिटात सवलतच नव्हे तर शाळा व महाविद्यालयांच्या वेळेप्रमाणे एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते. परिणामी गावातून शाळा-कॉलेजला जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसचे ‘कॉलेजची एसटी’ असे नामकरण देखील अनेक ठिकाणी झाले आहे.अंध आणि अपंग समाज घटकांकरिता एसटीची गेल्या अनेक वर्षांपासून भाडे सवलत योजना आहे. या योजनेअंतर्गत अंध व अपंग प्रवाशांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत देण्यात येते. सन २०१५ मध्ये रायगड जिल्ह्यात ७ लाख १७ हजार ४०१ अंध व अपंग प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या व्यतिरिक्त एसटीच्या मासिक सवलत पास योजना, विशिष्ट कालावधीकरिता सवलत योजना अशा योजना असून या योजनांचा जिल्ह्यात सुमारे दोन लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे.
एसटीचा ८५ लाख प्रवाशांना लाभ
By admin | Published: January 08, 2016 2:14 AM