मुंबई : उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. काही महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानंतर, पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून आणखी ८५ महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन केले जात आहे. यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर, सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल ३ आॅक्टोबर २०१५ पासून सेवेत आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर, आणखी दोन लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले. सीसीटीव्ही असणारी लोकलची चाचणी यशस्वी झाल्यानंतर, आणखी १७ लोकलमधील महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन केले गेले. १७ लोकलमधील ५० महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच पश्चिम रेल्वेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेकडून निविदा खुल्या करण्यात आल्या आणि त्यानंतर यावर काम सुरू करण्यात आले. सीसीटीव्ही बसवण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले असून, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. मध्य रेल्वेच्याही लोकलमधील एकूण ५० महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात आल्यानंतर, यातील १५ डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यात आल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. आणखी ३५ डब्यांत डिसेंबरपर्यंत सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक डब्यात साधारपणे तीन सीसीटीव्ही बसविले जात आहेत.(प्रतिनिधी)।मध्य रेल्वेला पॅनिक बटनाचा त्रासमध्य रेल्वेच्या एका लोकलमधील महिला प्रवाशांच्या डब्यात नुकतेच पॅनिक बटनही बसविण्यात आले आहे. मात्र, या पॅनिक बटनचा काहीसा त्रास मध्य रेल्वेला होत आहे. त्याचा दुरुपयोग काहींकडून केला जात असून, त्यामुळे लोकल गाड्यांना बराच वेळ थांबा मिळत आहे.
८५ महिला डब्यांत सीसीटीव्ही
By admin | Published: September 22, 2016 2:47 AM