राम देशपांडे : अकोला छोटी बाहुली, तिचं लहानसं घर, त्या घरात छोटी-छोटी खेळणी, कपबश्या, डायनिंग टेबल, पलंग, देवघर, गॅस स्टोव्ह, पिटुकली इस्त्री अशी इलवली-इलवी भांडी... हे सर्व साहित्य म्हणजे एखाद्याल लहान मुलीचा भातुकलीचा खेळ असे आपण म्हणू. मात्र, या खेळातली भातुकली आहे चक्क ८५ वर्षांची आजी. आश्चर्य वाटलं ना!प्रभावती सराफ असे आजींचे नाव. अकोलातील सराफा व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोतिराम सराफ यांच्या त्या मातोश्री. प्रभावतीबार्इंनी ५0 वर्षांपासून भातुकलीची खेळभाडी गोळा करण्याची आवड जोपासली. तब्बल २00 हून अधिक खेळभांड्यांचे संच त्यांच्याजवळ आहेत. ज्यामध्ये केवळ मातीचीच नव्हे, तर पितळ्याची, स्टिलची, लाकडाची, काचेची, प्लास्टिकची आणि हो चांदीची देखील खेळभांडी त्यांनी जतन करून ठेवली आहेत. ह्यमला खेळभांड्यांचं व्यसन लागलय.असे त्या अभिमानाने सांगतात. बहुदा सर्वचजण बालवयात कोणता ना कोणता छंद जोपासतात. मात्र, काळानुरूप आणि वयोमानापरत्वे त्या आवडी-निवडी, ते छंद आपण केव्हा जोपासले होते याचा देखील विसर पडतो. साधं उदाहरण घ्या ना, दिवाळीत तयार केलेल्या घरकुंडात आणि किल्ल्याभोवती खेळण्यासाठी बालगोपालांनासुद्धा आपली मनधरणी करावी लागते. मात्र, प्रभावतीबाई त्यास अपवाद ठरल्या आहेत. पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलींकरीता भातुकलीची खेळभांडे खरेदी केले.
कालपरत्वे मुलींच्या आवडी-निवडी बदलल्या. मात्र प्रभावतीबार्इंचे त्यात अधिक रमत गेल्या. ज्या ज्या ठिकाणी त्या गेल्या तेथून त्यांनी विविध प्रकारची खेळभांडी खरेदी करून त्यांचा संग्रह करण्यास प्रारंभ केल. कालांतराने, प्रथम मुलींचे व नंतर मुलांचे विवाह झाले. योगायोगाने प्रभावतीबार्इंना हा छंद जोपासण्यास त्यांच्या दोन्ही सुनांनी देखील मदत केली. त्यांची आवड व उत्साह पाहून इतर नातेवाईकांनीसुद्धा त्यांना ठिकठिकाणाहून खेळभांडी खरेदी करून आणून दिली.
आज ८५ व्या वर्षी प्रभावतीबार्इंचे दोन कपाट खेळभांड्यांनी भरून गेले आहेत. आजीने जमविलेली खेळभांडी खेळता-खेळता नातवंडंसुद्धा मोठी झाली. शिक्षण आणि नौकरीनिमित्त परगावी राणाऱ्या नातवंडांनीसुद्धा आजीकरीता नवनवीन खेळणी गोळा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.