पिंपरी : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठी नियुक्त केलेल्या मदत केंद्राच्या माध्यमातून ८८३ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. आरटीई प्रवेशाची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत (दि. २८)आहे.पिंपरी-चिचंवडमधील १५० शाळांच्या २३०० जागांसाठी हे अर्ज आले आहेत. प्रवेशासाठी पालकांनी या वेळी सायबर कॅफेवर जास्त प्रमाणात अर्ज भरले. आरटीई केंद्रावर कमी अर्ज भरले गेले. त्यामुळे प्रवेशाची एकूण आकडेवारी उपलब्ध झाली नाही. आरटीई प्रवेश १४ एप्रिलपासून सुरू झाले. भोसरीतील संत साई इंग्लिश स्कूल, दिघीतील हॉरिझन स्कूल, आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडिअम स्कूल, शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, मोरवाडीतील एसएनबीपी स्कूल, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपळे-गुरवमधील किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूल, सांगवीतील एम. एस. कीड्स, वाकडमधील एस. पी. स्कूल, काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर या ठिकाणी प्रवेश सुरू आहेत. प्रवेशाचे कामकाज एकूण दहा केंद्रांवर काम सुरू आहे. यासाठी विषयतज्ज्ञ व पर्यवेक्षक काम पाहत आहेत.गतवर्षी आरटीई प्रवेशाच्या झालेल्या गोंधळामुळे या वर्षी सुबद्ध नियोजन व मदत केंद्रामुळे बऱ्याच अंशी सर्व कामकाज सुरळीत झाले. तसेच, या वर्षी पालकांनी कागदपत्रांची जुळवाजुळवही वेळेत केली होती. तसेच बऱ्याच पालकांनी या वर्षी प्रवेश अर्ज वेळेत भरल्याने सर्व्हरवर ताण आला नाही. मात्र, पालकांच्या खिशाला भुर्दंड बसला. यासाठी पैसे भरून रांगेत उभे न राहताच अर्ज भरता येत आहेत. त्यामुळे आरटीईसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांना पालकांच्या संख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी) >प्रवेश अर्ज : यंदा दुपटीने वाढप्रवेशाचे अर्ज पालकांनी भरणे पसंत केले. प्रवेशासाठी गतवर्षी बराच वेळ लागल्याने या वर्षी पालकांनी दक्षता घेतली. अर्जात नमूद केलेल्या क्रमांकावर आरटीई संदर्भातील मेसेज पालकांना मिळणार आहेत. आरटीई प्रवेश लकी ड्रॉ पद्धतीने निश्चित होणार आहेत, अशी माहिती प्रशासन अधिकारी बी. सी. कारेकर यांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी पुणे विभागात ७ हजार ९०० जागांसाठी आतापर्यंत सुमारे १५ हजार अर्ज आले आहेत. हे अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने पुन्हा २८ एप्रिलपर्यंत मुदत वाढविली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आरटीई प्रवेशासाठी ८५० अर्ज दाखल
By admin | Published: April 27, 2016 1:51 AM