ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि.10 - अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे राजेशाही दसऱ्याचे यंदाचे ८५८ वे वर्ष आहे़ मंगळवारी सकाळपासून गादीपूजन, घोड्यांची शर्यत आणि गरबा स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. काठी संस्थानचा राजेशाही दसरा म्हणजे आदिवासी बांधवांचा महामेळावा़ १२४९ पासून सुरू असलेली काठी संस्थानची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात सुरू आहे. त्यात गेल्या १० वर्षांपासून कालानुरूप बदल होत आहे. मात्र मूळ परंपरेला छेद दिलेला नाही. कोणत्याही सण-उत्सवात सातत्याने बदल होत आहेत. मात्र सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात विखुरलेल्या आदिवासी बांधवांच्या परंपरा ‘जैसे थे’ आहेत.या अंतर्गत होणाऱ्या घोड्यांच्या शर्यती ह्या आदिवासी बांधवांसाठी मनोरंजनाची पर्वणीच समजली जाते. दसरा शर्यत, गाव दिवाळी आणि होळीची परंपरा कोणत्याही नियंत्रणाशिवाय आजही कायम आहेत. उत्सव आपलाच आहे, असे समजून ते साजरा करतात. दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा या प्रमाणे येथील दसरा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातून प्रेक्षक येतात.तीन राज्यातील आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत याठिकाणी उपस्थित देतात.- मंगळवारी सकाळपासून काठी येथे पूजेला सुरूवात होणार आहे़ पुजारी गोंबऱ्या वसावे यांच्याहस्ते ही पूजा होणार आहे़ प्रथम नवायखुटांची पूजा होऊन त्यानंतर राजगादी, ठाकरांची पूजा व शस्त्र पूजा होणार असल्याचे कळवण्यात आले आहे़ अश्व शर्यतींना दुपारी तीन ते चार वाजेपासून होणार आहेत़ यात १०० च्यावर स्पर्धक सहभाग घेतील़