नवी मुंबई : मीरारोड येथे राहणाऱ्या ९० वर्षांच्या हिराबाई आबासाहेब निकम (माई) यांनी २१०१ पर्यंतची दिनदर्शिका हाताने लिहून काढली आहे. पुढील ८६ वर्षांतील कोणत्या तारखेला कोणता वार असणार हे त्या तत्काळ सांगू शकतात. प्रत्येक नातेवाइकांचे मोबाइल नंबर या वयातही तोंडपाठ आहेत. सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपशिंगेमधील या आजीबार्इंना ९ दशकातील प्रत्येक घटना मुखोद्गत असून त्यांची स्मरणशक्ती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. गावातील प्रत्येक घरातील किमान एकतरी तरुण देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलात भरती झालेला आहे. स्वातंत्र्यापासून प्रत्येक युद्धात अपशिंगे गावातील सैनिकांचा सहभाग आहे, असे माई अभिमानाने सर्वांना सांगत असतात. २८ आॅगस्टला त्यांना ९० वर्षे पूर्ण झाली. या वयातही त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. घरातीलच नाही तर सर्व नातेवाइकांचे मोबाइल नंबर त्यांच्या मुखोद्गत आहेत. अनेकांना स्वत:च्या नंबर व्यतिरिक्त इतर कोणाचाही नंबर लक्षात ठेवता येत नाही. परंतु वृद्धापकाळातही एवढी स्मरणशक्ती असल्यामुळे माई सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनला आहे. वाचन व लिखाणासह चित्रकलेचा छंद त्यांनी जोपासला आहे. सहज म्हणून पुढील काही वर्षांची दिनदर्शिका हाताने लिहून काढण्यास सुरवात केली व तब्बल २१०१ पर्यंतची दिनदर्शिका तयार केली आहे. या कालावधीत कधी कोणता वार असणार हे त्या काही क्षणात सांगू शकतात. प्रत्येकाचा वाढदिवस व माहिती त्यांच्या दिनदर्शिकेमध्ये पाहता येते. स्वत:चे हस्तलिखित असलेल्या दिनदर्शिकेला लॅमिनेशन करून त्यांनी जपून ठेवल्या आहेत. त्यांचा हा छंद सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. भविष्यातील ८६ वर्षांची दिनदर्शिका तयार करणाऱ्या मार्इंना भूतकाळातील ९ दशकामधील प्रत्येक महत्त्वाची घटना लक्षात आहे. लहानपणी महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, इंदिरा गांधी यांची ऐकलेली भाषणे व त्या कार्यक्रमांचे प्रसंग कालच घडल्याप्रमाणे त्या सांगतात. पती सैन्यात असल्यामुळे त्यांच्याकडून ऐकलेल्या व उत्तर भारतात वास्तव्यास असताना अनुभवलेल्या युद्धाच्या कथा, प्रसंग व इतर घडामोडीही त्यांच्या लक्षात आहेत. युद्धाच्या कथा सांगताना त्यांचा उत्साह ओसांडून वाहत असतो. बाहेर फिरण्यासाठी गेल्यानंतर पाहिलेली वास्तू व इतर घटना कागदावर चित्राद्वारे रेखाटण्याचा छंदही त्या जोपासत आहेत. ९० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांना कधीच औषध घ्यावे लागले नाही. काठीचा आधार न घेता चालू शकतात.
आजीबार्इंनी बनविली ८६ वर्षांची दिनदर्शिका
By admin | Published: August 30, 2016 3:02 AM