- व्यंकटेश वैष्णव, बीडगेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थाही धावून आल्या. सिंचनाची मोठी कामे हाती घेण्यात आली. मागील दीड वर्षात दुष्काळी परिस्थिती असताना विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून, लोकसहभागातून जिल्ह्यात ८७ कोटींची कामे झालेली आहेत. गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पाझर तलाव, लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्याला आता दोन वर्षे पाण्याची चिंता नाही.सुरुवातीला बिंदूसरा प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पुढाकार घेत सर्व सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने या मोहिमेला बळ दिले. यानंतर नाम फाउंडेशन, जैन संघटना, मानवलोक यासह विविध संघटनांनी आपला सहभाग नोंदविला. गावातील नागरिकदेखील गाळ काढण्याच्या कामासाठी एकवटले. यातून पाझर तलाव, लघु प्रकल्प व मध्यम प्रकल्पातील १२५ लाख घनमीटर गाळ काढला. यासाठी शासनाने निविदा काढल्या असत्या तर अंदाजित ६२.५० कोटी रुपयांचा खर्च झाला असता. ६८ कामे लोकसहभागातून झाली आहेत. नदी रुंदीकरण खोलीकरण काम पूर्णबीड तालुक्यातील लोळदगाव येथे नाम फाउंडेशनच्या सहयोगातून नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे मोठे काम पूर्ण झाले आहे. बिंदूसरा नदी पात्रावर हे काम असल्याने सद्य:स्थितीत मोठा जलसाठा झाला आहे. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम मानवलोकच्या माध्यमातून झाले. अभिनेता आमीर खान याने पुढाकार घेऊन अंबाजोगाई तालुक्यातील वॉटर कप स्पर्धा घेऊन राडीतांडा व खापरटोन येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे केली.बीडसारख्या ठिकाणी लोकसहभागातून कामे होत नसतात, असे म्हटले जात होते. मात्र झालेली सिंचनाची कामे पाहता कार्य संस्कृती बदलाचे प्रतीक म्हणून या कामांकडे पाहावे लागेल. - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी बीड
लोकसहभागातून ८७ कोटींची कामे
By admin | Published: October 16, 2016 2:20 AM