मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे २७ मार्च रोजी सांगली येथे उद्घाटन होणार असून, १४ जून रोजी मुंबईत समारोप होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत या नाट्य संमेलनाची रूपरेषा जाहीर केली.२५ मार्च २०२० रोजी तंजावर येथे या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. २७ मार्च ते २९ मार्च या कालावधीत १०० व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटनाचे मुख्य कार्यक्रम सांगली मुक्कामी होणार आहेत. तर, ८ ते १४ जून या कालावधीत नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. मधल्या काळात, म्हणजे एप्रिल ते जूनमध्ये नाट्य संमेलनाचे महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम होणार आहेत. मुंबईत आयोजित समारोप सोहळ्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाट्यप्रयोग होतील.या दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे १४ जूननंतर भारतभर कार्यक्रम करण्यात येणार आहेत. बडोदा, भोपाळ, उज्जैन, दिल्ली आदी ठिकाणी हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या नाट्य संमेलनाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका लवकरच जाहीर केली जाईल, असे प्रसाद कांबळी यांनी यावेळी स्पष्ट केले. १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची निवड याआधीच झाली आहे.
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सांगलीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:50 AM