लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या उपनगरीय लोकलमधील बॉम्बस्फोटाला सोमवारी अकरा वर्षे पूर्ण झाली. बॉम्बस्फोटानंतर ‘लाइफलाइन’मधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ९०० पेक्षा जास्त कॅमेरे बसवले असून आणखी १ हजार १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे या स्थानकांत इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमने (आयएसएस) सज्ज असलेल्या उच्च प्रतीचे अत्याधुनिक कॅमेरे बसवले आहेत. रेलटेलच्या माध्यमातून दोन वर्षांच्या आत उर्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येतील. त्यासाठी रेल्वेने पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आधुनिक व्हिडीओ सॉफ्टवेअर यंत्रणेने सीसीटीव्ही लावलेल्या स्थानकांवर देखरेख ठेवण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा दलातर्फे मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर जवानांसाठी बुलेटप्रूफ बंकरची उभारणीही करण्यात येणार आहे. जवानांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी या बंकरची उभारणी करण्यात येणार असून ट्रॉलीप्रमाणे हे बंकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सहज शक्य होते. त्यामुळे अतिरेकी हल्ल्यांत थेट मुकाबला करण्यासाठी हे फायदेशीर ठरतील, असा प्रशासनाचा दावा आहे. या बंकरची किंमत प्रत्येकी चार लाख रुपये असून सीएसटीएम आणि एलटीटी स्थानकांत प्रत्येकी दोन, तर दादर आणि ठाणे स्थानकांत प्रत्येकी एक बंकर उभारण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्य सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली.डॉग स्कॉडसह नियमित तपासणी सीएसटीएम स्थानकांवर प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवाशांच्या तपासणीसाठी १०० हँड डिटेक्टर तैनात करण्यात आले आहे. शिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने डॉग स्कॉडसह नियमित रेल्वे स्थानकांची तपासणी करण्यात येते.
प्रवाशांवर ९०० सीसीटीव्हींचा वॉच
By admin | Published: July 11, 2017 2:43 AM