ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - शहरातील पोलिसांच्या ३०८ निवासस्थानांसाठी आणि बराकींच्या बांधकामसाठी राज्य शासनाने९३.५० कोटी रुपये मंजूर केले असून गेल्या ३ डिसेंबर रोजी या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यात अनेकदा पोलिसांच्या निवासस्थानांसाठी शासनाने टप्प्याटप्प्याने निधी दिला आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाला बांधकामासाठी निधी मिळाला नव्हता, हे येथे उल्लेखनीय. या तीनही कामांच्या मंजुरीबाबतचे शासनाचे परिपत्रकही जारी झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी पोलीस विभागाला देण्यात आला आहे. इंदोरा येथे ११२ पोलीस निवासस्थाने बांधण्यात येत असून या बांधकामासाठी शासनाने ३४.७० कोटी रुपये मंजूर केले असून हर्ष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या कामाचे कार्यादेश दिले आहे. या बांधकामासाठी सर्व सुविधाही पुरविण्यात येणार आहेत. २४ महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे. तसेच पाचपावली येथे १९६ पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत असून यासाठी ५८.४० कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून गेल्या महिन्यातच या कामाचेही कार्यादेश देण्यात आले आहेत. हे कामही २४ महिन्यात पूर्ण करायचे आहे. याशिवाय पोलीस मुख्यालय लोहमार्ग येथील नवप्रविष्ठांच्या बराकीच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर बराकीचे बांधकाम करण्यासाठी ३९,४०,७६० रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात पोलीस विभागाला बांधकामांसाठी आणि विशेषत: पोलिसांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे.