ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. ५ : संत गाडगेबाबा मतिमंद निवासी शाळा स्वत:च्या नावावर नसताना आपली आहे असे सांगून ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विष्णू अर्जुन दळवी (वय ४०, रा. खडकत रोड, ता. आष्टी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश पी. एम. बिदादा यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तुळजाभवानी महिला मंडळ संस्था, आष्टी, जिल्हा बीड ही संस्था विष्णू अर्जुन दळवी याची पत्नी नालंदा बलभीम खाडे यांच्या नावावर आहे तर संत गाडगेबाबा मतिमंद निवासी शाळा, ता. चाकूर, जिल्हा लातूर ही संस्था नावावर नसताना स्वत:ची आहे, असे सांगितले. ही संस्था तुळजाभवानी महिला मंडळामार्फत चालते असे खोटे सांगून ३० लाखात खरेदी / हस्तांतरण करण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी शहाजहान सिकंदर मुल्ला (वय ४१, रा. ४३, टंकसाळ कॉलनी, होटगी रोड) यांच्या ओलावा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर या संस्थेचे फिर्यादीची सही असलेले कोरे लेटरपॅड घेतले. त्यावर विष्णू दळवी याने स्वत:च्या हस्ताक्षरात त्याच्या नावावर असलेली सद्गुरू सदानंद शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड (निवासी मतिमंद विद्यालय) या संस्थेची संत गाडगेबाबा मतिमंद निवासी शाळा, ता. चाकूर, जिल्हा लातूर ही शाळा हस्तांतरित व स्थलांतरित करावयाची आहे, असे नमूद केले.
विष्णू अर्जुन दळवी, संतोष अर्जुन दळवी, नालंदा बलभीम खाडे (रा. आष्टी, जिल्हा बीड) यांनी संगनमत करून संस्थेच्या शासनाच्या पत्राची झेरॉक्स फिर्यादीस देऊन विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून रोख २० लाख रुपये घेतले. अशाच प्रकारे संस्था व अपंग शाळा, आश्रम हस्तांतरण व स्थलांतर करून देण्याचे आमिष दाखवून सुभाष विठ्ठल ननवरे यांच्याकडून २० लाख रुपये रोख, विष्णू अंबाजी मोरे यांच्याकडून २४ लाख रुपये रोख, गुरुप्रसाद रवींद्रनाथ तलवार यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये रोख घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात विष्णू दळवी याला अटक झाली असून त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली. सरकारतर्फे एम. आय. बेसकर तर आरोपीतर्फे अँड. शशी कुलकर्णी, अॅड. प्रशांत नवगिरे हे काम पाहत आहेत.